म. फुले व डॉ.आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात

0
12

सडक अर्जुनी दि.19: महात्मा जोतिबा फुलेंनी ओबीसी समाजाकरिता अविस्मरणीय असे कार्य केलेले आहे. त्यानंतर ओबीसी समाजासाठी अपूर्ण राहिलेले कार्य त्यांचे शिष्य विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन जगदीश येळे यांनी केले. ते महात्मा फुले व डॉ.आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समारोहात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
महात्मा जोतिबा फुले यांची १९0 वी जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२६ व्या जयंतीचा संयुक्त समारोह तालुक्यातील कोसमतोंडी येथे शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक प्राप्त संत बांगळू बाबा आदिवासी शैक्षणिक सुधारणा मंडळाच्या वतीने फुलीचंद भगत विद्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील लताताई काळसर्पे, ग्रा.पं.सदस्य जगदीश काशीवार, ब्रिजलाल ठवरे, अनिल वैद्य, अशोक कान्हेकर, डॉ.गणूजी काशीवार, हंसराज वैद्य, किशोर मळकाम, प्राचार्य एन.एम. मारगाये, महादेव पुस्तोडे उपस्थित होते. याप्रसंगी येथील विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गीत व भाषण सादर केले. तसेच प्रमुख पाहुण्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे ज्ञानदिनाच्यानिमित्त विद्यार्थी डॉ.आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ज्ञान परीक्षेत मोठय़ा संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.