कत्तलीसाठी जनावरांना घेऊन जाणारा ट्रक पकडला

0
20

गोंदिया दि.22-: अवैधरित्या जनावरांची कत्तलीकरिता वाहतूक करताना ३५ जनावरांची सुटका व ट्रकसह एकूण १५ लाख ३६ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची घटना २0 एप्रिल रोजी रात्री ८.३0 वाजताच्या दरम्यान कोहमारावरून नवेगावबांधकडे जाणार्‍या टी-पॉईंटवर घडली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली आहे.
जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविरुद्ध पोलीस अधीक्षकांनी कडक धोरण स्वीकारले असून जिल्ह्यातून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक डुग्गीपार पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून राज्य महामार्गावरील नवेगावबांधकडे जाणार्‍या टी-पॉईंटवर नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान एक बारा चक्का ट्रक क्रमांक एम.एच. ३५/ के ५१८६ ला थांबवून झाडाझडती घेतली असता आरोपी चालक फिरोज नईमखाँ पठाण (२८), शादिक छोटेसाब शेख (३५), याशिन आशिफ शेख (२0) यांच्या ताब्यातील ट्रकमध्ये ३५ जनावरे कोंबलेल्या अवस्थेत कत्तलीकरिता नेत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून ३५ जनावरे किंमत २ लाख ३६ हजार व ट्रक १३ लाख रुपये असा एकूण १५ लाख ३६ हजार रुपयाचा माल व आरोपींकडून जप्त करण्यात आला. आरोपींवर डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख सपोनि किशोर पर्वत, सपोनि चंद्रकांत करपे, पोहवा श्यामसुंदर डोंगरे, धनेश्‍वर पिपरेवार, राकेश डोंगरवार, लखनलाल काटेगा व राव यांनी पार पडली.