मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमाबाबत गडचिरोलीत सकारात्मक प्रतिक्रिया

0
12
गडचिरोली ,दि.28: : ` मी मुख्यमंत्री बोलतोय ` या कार्यक्रमास गडचिरोली जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद लाभला असून सर्वच शेतकऱ्यांमध्ये शाश्वत शेतीसाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनाबाबत सकारात्मक अशी प्रतिक्रिया उमटली आहे.
`मी मुख्यमंत्री बोलतोय ` या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. आणि त्याव्दारे आगामी काळात करण्यात येत असलेल्या बदलांबाबत आपली मते मांडली होती. शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय पीक विक्रीचा अधिकार देण्याचे धोरण शासनाने अवलंबिलेले आहे. यातून शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. मध्यस्थामार्फत होणाऱ्या विक्रीमुळे मिळणारा नफा मारला जात होता. मात्र अशा पद्धतीने थेट बाजारात विक्री झाल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ होणार आहे असे गोंडवाना विद्यापीठ विधीसभा सदस्य प्रकाश गेडाम यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. याला यांत्रिकीकरणाची जोड दिली गेल्यास खरिपानंतर दुसऱ्या हंगामातही शेती शक्य होईल यासाठी शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची मदत होणार आहे असे ते म्हणाले.शेतकऱ्यांसाठी वित्त सहाय्य करण्यासोबतच प्रधानमंत्री फसल विमा योजनेतून त्यांना अतिरिक्त संरक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेती हा फायद्याचा व्यवसाय ठरणार आहे. शाश्वत शेतासाठी होणारे प्रयत्न आवश्यकच होते, अशी प्रतिक्रिया कृषी तंत्रज्ञ अ. ना. सोनावणे यांनी दिली.