नक्षल्यांनी घडविलेल्या भूसुरुंग स्फोटात शहिद झालेल्या जवान सुरेश तेलामी यांना मानवंदना

0
14

गडचिरोली दि.४: भामरागड जवळ झालेल्या नक्षल चकमकीतील जखमी जवानांना वाचविण्यासाठी निघालेल्या पोलीस दलाच्या जवानांच्या गाडीसमोर स्फोट घडविण्यात आला. यात गडचिरोली पोलीस दलाचा जवान सुरेश लिंगा तेलामी हा शहीद झाला. पोलीस मुख्यालयात पोलीस दलातर्फे या शहीदाला मानवंदना देण्यात आली.
नक्षल चकमकीत ३ जवान जखमी झाले होते. त्यांना आणायला गेलेल्या प्राणहिता पोलीस केंद्राच्या गाडीला स्फोटाव्दारे उडविण्यात आल्याची घटना घडली. यात जखमी झालेल्या तेलामीला आज विरमरण प्राप्त झाले. इतर जखमी शिपाई व जवानांना नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर धिरगंभीर वातावरणात मानवंदना देण्यात आली. यावेळी वीरमरण प्राप्त तेलामीला २१ तोफांची सलामी व शोक परेडद्वारे पोलिसांनी आपल्या सहकाऱ्याप्रती शोकसंवेदना व्यक्त केली.
शहिद तेलामी यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा आणि आई असा परिवार आहे. ते भामरागड तालुक्यातील रहिवासी होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर, पोलिस दलातर्फे १९२ केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी शान्तनु गोयल, अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री आत्राम यांनी शहीद परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले आणि शासनातर्फे शहिद परिवारास सर्वतोपरी सहाय्य करु असे सांगितले. संपूर्ण गडचिरोली पोलीस दल तसेच एस.आर.पी.एफच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थिती नोंदवून शहिदास मानवंदना दिली.