कोनसरीचा लोहप्रकल्प रद्द करा-शिष्टमंडळाचे अहेरीच्या एसडीओंना निवेदन

0
11

अहेरी,दि.१५: चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे सुरु होणारा लोहप्रकल्प रद्द करुन तो अहेरी उपविभागातच सुरु करावा, अशी मागणी करणारे निवेदन आज सुरजागड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते मेहबूब अली, सुरेश बारसागडे, अमोल मुक्कावार, श्रीकांत गदेवार, मिलींद अलोणे, चेतन अलोणे, सरिता पुंगाटी, दिक्षा झाडे, मयुर चांदेकर, अक्षय येलावार, निखिल गद्देवार, आदित्य जक्कोजवार, रितेश मोहुर्ले, केतन सिध्दमशेट्टीवार सुमित मोतकुरवार, देवेंद्र खतवार आदी उपस्थित होते.

लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीतर्फे वर्षभरापासून एटापल्ली येथील सुरजागड पहाडावरुन लोहखनिज उत्खनन करण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वीच कोनसरी येथे लॉयड मेटल्सच्या स्पाँज आयरन प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पुन्हा लोहप्रकल्पाचा मुद्दा ऐरणीवर आला. एटापल्ली व भामरागड तालुक्यातील ग्रामसभा व इलाका समित्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर सभा घेऊन पर्यावरणाच्या दृष्टीने लोहप्रकल्प आणि संपूर्ण खाणच रद्द करावी, अशी मागणी केली, तर काहींनी हा प्रकल्प एटापल्ली तालुक्यातच व्हावा, अशी भूमिका घेतली. याच प्रकल्पाच्या अनुषंगाने आज सुरजागड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने अहेरी येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरापासून छोटेखानी मोर्चा काढून राजे विश्वेश्वरराव चौकमार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. उपविभागीय अधिकारी श्री.तेलंग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.