स्वच्छ व सुंदर गोंदियासाठी अतिक्रमण हटाव मोहिम प्रभावीपणे राबवा-बडोले

0
16

गोंदिया,दि.१६ : घाणेरड्या शहराच्या यादीत गोंदिया शहराचा समावेश आहे.सांडपाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे गटारे तुंबली आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होवून डासाचे प्रमाण वाढले आहे.अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे.आता गोंदिया हे शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहिम प्रभावीपणे राबवा असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शहरातील अतिक्रमणाबाबतचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, आमदार विजय रहांगडाले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील, तहसिलदार अरविंद हिंगे, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता श्री.मडके, ठाणेदार शुक्ला व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शहरात मोठया प्रमाणात अतिक्रमण वाढले, अतिक्रमणामुळे मार्केटमधून फिरणे देखील कठीण झाले आहे. अतिक्रमणधारकांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस देऊन अतिक्रमण हटाव मोहिम सुरु करा.जे अतिक्रमण काढायचे आहे त्याची मार्कींग करावी.डॉटेड लाईनच्या बाहेरचे अतिक्रमण काढावे.अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही यादृष्टीने कार्यवाही करावी. अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याबाबतची पूर्व कल्पना पोलीस विभागाला दयावी. अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी आवश्यक ते पोलीस बल मागवून घ्यावे व पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी काळे म्हणाले, गोंदिया शहरातील अतिक्रमण हटाव मोहिम लवकरच सुरु करण्यात येईल.ज्यांचे अतिक्रमण तोडले जाणार आहे त्या अतिक्रमण धारकाकडून खर्चाचा पैसा वसूल करावा, असे सांगितले.नगराध्यक्ष इंगळे म्हणाले, शहरात ज्या-ज्या व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे त्यांना ते अतिक्रमण काढण्याबाबतच्या नोटीस दिल्या आहेत. त्यांनी स्वत:हून केलेले अतिक्रमण काढावे अन्यथा अतिक्रमण मोहिमे दरम्यान ही अतिक्रमणे काढण्यात येतील. नगर पालिकेत कर्मचाèयांची कमतरता आहे,त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीमेत अडचण येत असल्याची समस्या नगराध्यक्षांनी मांडली.