आल्लापल्लीजवळ बस बोलोरो अपघातात एक ठार

0
7

आलापल्ली,दि.२१ – सिरोंचा मार्गावरील उमानूर गावापासून १ किमी अंतरावर बेजुरपल्लीवरून जिमलगट्टा येथील आठवडी बाजारासाठी प्रवासी घेवून येत असलेल्या बोलेरो वाहनाने उभ्या बसला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात १ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. अन्य सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. मृतक इसम बेजुरपल्ली येथील उपसरपंच आहे.

पोचा कुले गावडे असे मृतकाचे नाव असून ते बेजुरपल्ली येथील उपसरपंच होते. राजेश रोशन दुर्गे (३७) रा. मरपल्ली हा गंभीर जखमी आहे. तर किरकोळ जखमींमध्ये लक्ष्मी ढुरके (५०) रा. बेजुरपल्ली, लक्ष्मी इरपा मडे, सोनी बका वेलादी (२२) , सिरीया पेंटा वेलादी (२५) , शंकर दुर्रापा अटेला (४५) , कुले रामा वेलादी (५०) , तुंगी व्यंकटेश मडावी सर्व रा. बेजुरपल्ली यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार बोलेरो वाहन क्रमांक एमएच ३३ जी १३२९ ने बेजुरपल्ली येथून काही नागरिक जिमलगट्टा येथील आठवडी बाजारासाठी येत होते. दरम्यान उमानूरपासून १ किमी अंतरावर एमएच ४० एक्यू ६०७१ क्रमांकाची बस उभी होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाची बसला मागून जबर धडक बसली. यामध्ये एक जण जागीच ठार झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या वाहनात २५ ते ३० प्रवासी बसले होते. जखमींना तत्काळ रूग्णालयात हलविण्यात आले आहे