शहीद पोलीस शिपायांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही-पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ

0
9

गोंदिया,दि.१ : पोलीस दल हे देशातील लोकांच्या संरक्षणाचे काम करीत असून स्वत:च्या जीवाची पर्वा करीत नाही. नक्षलवाद असो वा आतंकवाद माजविणाऱ्या अविवेकी बुध्दीचा वापर करुन समाजात दहशत पसरविणाऱ्या उग्रवादयांचा नेहमीच सामना करुन आपल्या वीरतेचा समाजाला व राष्ट्राला परिचय करुन दिला आहे. नक्षल्यांशी सामना करतांना शहीद झालेले विजय भोयर यांच्या वीरतेला मी सलाम करीत असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांनी केले.
तिरोडा तालुक्यातील सेलोटपार येथे भोयर कुटूंब व ग्रामपंचायत सेलोटपार यांच्या संयुक्त वतीने शहीद शिपाई विजय भोयर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांनी केले, यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आमदार दिलीप बन्सोड, जि.प.माजी उपाध्यक्ष पंचम बिसेन, पं.स.सभापती उषा किंदरले, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, श्रीमती इलमे, माजी पं.स.सदस्य संजय किंदरले, लोकशाहीर मधुकर बांते, सेवानिवृत्त अभियंता डी.यू.रहांगडाले, कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस लिलाधर पातोडे, अधिकारी-कर्मचारी संघटनेचे सचिव दुलीचंद बुध्दे व तुलसीदास झंझाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
३० मे २००५ रोजी सालेकसा तालुक्यातील बेवारटोला येथे नक्षल हमल्यात शहीद विजय भोयर यांना वीरमरण आले होते. त्यांच्या स्मृतीदिनी भोयर कुटूंबीय, ग्रामपंचायत सेलोटपार व ग्रामस्थांच्या सहभागातून ३० मे २०१७ रोजी शहीद विजय भोयर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.प्रास्ताविक दुलीचंद बुध्दे यांनी केले. संचालन सेलोटपारचे सरपंच रामेश्वर हलमारे यांनी केले, उपस्थितांचे आभार राधेश्याम मते यांनी मानले. कार्यक्रमाला सेलोटपार व परिसराच्या गावातील नागरिक तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.