गोंदिया-चंद्रपूर मार्गावर लवकरच धावणार विजेवर ट्रेन

0
13

गोंदिया,दि.07 : गोंदिया ते चंद्रपूर लोहमार्गावर मागील अनेक दिवसांपासून विद्युतीकरणाचे काम सुरू होते. ते काम आता अंतिम टप्प्यात असून येत्या महिन्याभरात या मार्गावर विजेवर रेल्वे गाड्या धावणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.गोंदिया ते चंद्रपूर लोहमार्गावर विद्युतीकरणाचे काम नागभीडच्या पुढे काही किमी. अंतरापर्यंत पूर्णत्वास गेले आहे. चंद्रपूरपर्यंत केवळ २० किमीचे अंतर बाकी असून या २० किमीपर्यंत विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. येत्या महिन्याभरात हे काम पूर्णत्वास जाणार असून यानंतर लवकरच या मार्गावर विजेवर रेल्वे गाड्या धावणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

याशिवाय इतवारी ते काचेवानीपर्यंत आॅटोमेटिक सिग्नलिंगचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच गोंदिया ते गुदमापर्यंतही हे काम झाले आहे. मात्र काचेवानी ते गंगाझरी व गंगाझरी ते गोंदियापर्यंत आॅटोमेटिक सिग्नलिंगचे काम बाकी आहे. हे काम पूर्ण होताच रेल्वे गाड्या विलंबाने धावण्याचे प्रकार बंद होणार आहेत.रेल्वे स्थानकानंतरची पहिली चौकी रेल्वेगाडीने ओलांडल्यावर स्थानकावरून त्वरित दुसरी रेल्वेगाडी या आॅटोमेटिक रेल्वे सिग्नलिंगच्या प्रक्रियेने सोडता येणार आहे. यामुळे रेल्वेगाड्या विलंबाने धावण्याच्या प्रकारावर आळा बसणार आहे.