जलयुक्त शिवार अभियानातून शेतीला प्राधान्य – राजकुमार बडोले

0
12

सडक/अर्जुनी,दि.१४ : सन २०१९ पर्यंत राज्यातील गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भात खाचरे दुरुस्ती, नाला खोलीकरण, बोडी नुतनीकरण, साठवण बंधाऱ्याची कामे जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी समृध्द कसा होईल यासाठी या अभियानातून शेतीला प्राधान्य देण्यात आल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक/अर्जुनी तालुक्यातील पाटेकुर्रा येथे १२ जून रोजी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणाऱ्या गाव तलावाची दुरुस्ती आणि बोडी दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री बडोले यांनी केले. यानिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पं.स.सभापती कविता रंगारी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्य राजेश कठाणे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.भुमेश्वर पटले, वसंत गहाणे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पथाडे, प्रभारी उपविभागीय कृषि अधिकारी श्री.कोटांगले, तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम, सरपंच केशवराव भलावी, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य चेतन वडगाये, उपसरपंच निर्मला घरत, पोलीस पाटील ललीता कवरे, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री वनिता कटरे, भूमिता पारधी, रेवता वाघाडे, देवीलाल कटरे, गुनीलाल रहांगडाले, अमित चकाटे व विजय सोनवणे यांची उपस्थिती होती.
यावेळी तालुका कृषि अधिकारी श्री.तुमडाम व कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.पटले यांनीही मार्गदर्शन केले. तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते गाव तलावाच्या कामाचे व शेतकरी जगन्नाथ रहांगडाले यांच्या शेतात बोडी नुतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच केशवराव भलावी यांनी केले. यावेळी पाटेकुर्रा ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.