अश्लिल व्हिडीओ व्हायरल प्रकरणी एआरबी ट्रॅव्हल्सच्या चार जणांना दोन दिवसाचा पीसीआर

0
11

गडचिरोली, दि.५: केवळ गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात गाजत असलेल्या ट्रॅव्हल्समधील अश्लिल व्हिडीओप्रकरणी नागभिड पोलिसांनी काल(दि.४) रात्री उशिरा गडचिरोली येथील एआरबी ट्रॅव्हल्सच्या चार जणांना अटक केली.  न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सारंगधर बाबूराव रामटेके (३०), राकेश मधुकर खोब्रागडे (२०), मच्छींद्र विठोबा सहारे (२९) व अंकुश नकटू रणदिवे (२४) अशी आरोपींची नावे असून, या प्रकरणातील आरोपींची संख्या आता पाचवर पोहचली आहे. गडचिरोली येथील एमएच ३३-१२७७ क्रमांकाच्या एआरबी ट्रॅव्हल्समधून नागपूर-नागभिड असा प्रवास करताना आरमोरी येथील रवींद्र शामराव बावनथडे याने एका युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. परंतु ट्रॅव्हल्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने बावनथडेचे कृष्णकृत्य कॅबिनमध्ये बसलेले ट्रॅव्हल्सचे कर्मचारी बघत होते. त्यांनी बावनथडेला न हटकता त्याच्या कृष्णलिलांची चित्रफित व्हॉटस् अॅपवरुन व्हायरल केली. पाहतापाहता ही चित्रफित सर्वत्र पोहचली. ‘गडचिरोली वार्ता’ने सर्वप्रथम या प्रकरणाचा भंडाफोड केल्यानंतर राज्य व देशभरातील वृत्त वाहिन्यांनीही मोठमोठ्या बातम्या प्रसारित केल्या. अशातच पीडित युवतीने २ जुलै रोजी आपणास नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून रवींद्र बावनथडे याने आपले शारीरिक शोषण केल्याची तक्रार नागभिड पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी ३ जुलैला रवींद्र बावनथडेला भादंवि कलम ३७६ अन्वये गुन्हा नोंद करुन अटक केली. त्यानंतर पोलिसांनी एआरबी ट्रॅव्हल्स ताब्यात घेतली. पुढे सायबर क्राईम ब्रँचच्या चमूने सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील सर्व फूटेज बघून ट्रॅव्हल्सचा चालक, वाहक व व्हिडीओ सुरु करणारा आणि तो व्हायरल करणाऱ्या अन्य दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाईल व हार्डडिस्कही ताब्यात घेण्यात आली आहे. चौघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक मडावी प्रकरणाचा तपास करीत आहेत.