देवरी तालुक्यात हजारो टन खताची अवैध विक्री?

0
14

गोंदिया,दि.13- देवरी तालुक्यातील चिचगड व लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर खताचा अवैध विक्री सुरु असल्याची माहीती आहे. विनापरवाना रासायनिक खते विकणाऱ्यांचे कृषी अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्याचा आरोप नागरिक करीत असून आरडाओरड सुरू झाल्याने अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून खतांचा साठा व्यापाऱ्यांनी इतरत्र हलवायला सुरवात केल्याची चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिचगड, पालांदूर आणि ककोडी परिसरात रासायनिक खतांची अवैध विक्री होत असून गरीब व आदिवासी शेतकऱ्यांना चढ्या दराने खते विकण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. चिचगड येथे सुमारे 4 ते 5, पालांदूर येथे दोन तर ककोडी परिसरात काही व्यापारी विनापरवाना रासायनिक खताची खुलेआम विक्री करीत आहेत. नियमानुसार रासायनिक खते आणि किटकनाशके विक्रीसाठी परवाना आवश्यक असून किटकनाशके विकण्यासाठी दुकानदाराची पात्रता असणे आवश्यक आहे. असे असताना तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांचे या दुकानदारांना पाठबळ आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाची व्याच्यता होत असल्याने या अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानदारांना कारवाईपासून बचावासाठी साठा इतरत्र हलविण्याचा सल्ला दिल्याचे समजते. परंतु, साठा अधिक असल्याने याकामी व्यापाऱ्यांची दमछाक होत असल्याचे सांगण्यात येते.
प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.