अर्जूनीमोर तालुक्यात एक इसम पूरात वाहून गेला,जरुघाटा गावात पुराचे थैमान

0
10

गोंदिया,दि. १५ : प्रदीर्घ विश्रांतीनंतर आलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात कहर केला. गाढवी नदीला पूर आल्याने लहान पूल ओलांडताना अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या जुनी चिचोली येथील एक व्यक्ती वाहून गेला. ही घटना शनिवारी (दि.१५) सकाळी ९ च्या सुमारास घडली. शोध व बचाव पथकाला दोघांना वाचविण्यात यश आले.
महेंद्र तुळशिराम लांडगे (वय ४५) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे तर, पांडुरंग मेश्राम (वय ५०) व बुद्धिवान मेश्राम(वय ४२) असे सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहे. तिघेही जुनी चिचोली येथील रहिवासी आहेत. तालुक्यातील केशोरी नजिकच्या जरुघाटा येथे पावसाने कहर केला असून पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार बोंबार्डे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अर्जूनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली असून पूरपरिस्थिती बिकट बनली आहे. तालुक्यातील केशोरी जवळून वाहणाèया जरुघाटा नाल्याला आलेल्या पूराचे पाणी नाल्यालगतच्या जरुघाटा गावातील अनेक घरात घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुका प्रशासनाने पूरग्रस्तांना नजीक शाळा आणि अंगणवाडी केंद्रात स्थलांतरित केल्याची माहिती तहसीलदार बोंबार्डे यांनी दिली आहे. सद्यःपरिस्थितीत आपदग्रस्तांना धान्याचा पुरवठा केला गेला असून आर्थिक मदत येत्या सोमवार पर्यंत देण्यात येणार आहे
काल, शुक्रवारी रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात बस्तान मांडले आहे. आज, शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरूच होता. या पावसामुळे गावढी नदी ओसंडून वाहू लागली. लहान पुलावर चार ते पाच फुट पाणी चढले. आज, शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास महेंद्र लांडगे, पांडुरंग मेश्राम, बुद्धिवान मेश्राम हे पायदळ केशोरी येथे काही कामानिमित्त गेले होते. तिथून गावाकडे परतताना तिघेही लहान पूल ओलांडत होते. मात्र, पाण्याच्या प्रवाहात त्यांचा तोल गेला व तिघेही वाहू लागले. पांडुरंग मेश्राम, बुद्धिवान मेश्राम हे एका झुडपाला अडकून राहिले. दरम्यान, याची माहिती मिळताच अर्जुनी मेोरगाव तालुका शोध व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही बाहेर काढले. परंतु, महेंद्र लांडगे हे वाहून गेल्याने त्यांचा सायंकाळपर्यंत शोध लागला नाही. अर्जुनी मोरगाव व गोंदिया येथील शोध व बचाव पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, तहसीलदार बोंबार्डे,गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, ठाणेदार थोरात,शाखा अभियंता डी.टी.देशमुख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रोफेशनल प्रवीण सरोहा, दहा पोलिस जवान, दहा होमगार्ड तैनात आहेत. नदीत नाव टाकून वाहून गेलेले महेंद्र लांडगे यांचा शोध घेतला जात आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातीलच जरूघाटा गावाला पावसाने वेढा घातला. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. आपादग्रस्तांना शाळा, अंगणवाडीत हलविण्यात आले आहे. तालुका व जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या रेशनची व्यवस्था करण्यात आली आहे.