रामदेवबाबांचा माल विदेशात जातो, शेतकऱ्यांचा का नाही?

0
12

बुलडाणा,दि.17-शेतमालाला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. म्हणून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर ५० टक्के अधिक नफा देऊन त्यांचा माल जागतिक बाजारपेठेत पाठविण्यात यावा. रामदेवबाबांचा माल जपान आणि अमेरिकेत जात असेल तर शेतकऱ्यांचा माल का जाऊ नये, असा संतापजनक सवाल शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला.शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी राज्यभरात सुकाणू समिती शेतकरी मेळावे घेत आहे. कर्जमुक्तीबरोबरच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हायला हव्यात. त्यासोबतच्या ३० मागण्याही मंजूर करण्यात याव्या, यासाठी ठिकठिकाणी सुकाणू समिती शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी एल्गार मेळावा आयोजित करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचा मतदारसंघ असलेल्या खामगावात सुकाणू समितीच्या शेतकरी एल्गार मेळावा रविवारी आईसाहेब मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला सुकाणू समितीचे नियंत्रक डॉ. अजित नवले, काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन अमदाबादकर उपस्थित होते.