आरएफओची वनपालास अर्वाच्च शिवीगाळ

0
6

गडचिरोली,दि.१७: सिरोंचा तालुक्यातील असरअली येथील वनपरिक्षेत्राधिकाऱ्याने त्याच्या अधिनस्थ वनपालास अश्लिल शिवीगाळ करुन असभ्य वागणूक दिल्याने महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेचे पदाधिकारी संतप्त झाले असून, त्यांनी संबंधित आरएफओवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वनपरिक्षेत्राधिकाऱ्याने वनपालाशी असभ्य वर्तणूक केल्याचे प्रकरण निदर्शनास आल्यानंतर वनरक्षक-वनपाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. असेच निवेदन गडचिरोलीच्या मुख्य वनसंरक्षकांनाही देण्यात आले आहे. निवेदनात संघटनेने म्हटले आहे की,वनपाल के.एफ.दुर्गे हे त्यांच्या बँक कर्जविषयक फाईलमधील शिफारस पत्रावर वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी त्यांच्या कक्षात गेले. मात्र वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी शिफारसपत्र फाडून फाईल भिंतीवर फेकली. शिवाय वनपाल दुर्गे यांना अश्लिल शिवीगाळ करुन टाचणीचा डबा फेकून मारण्यासाठी हातात उचचला. यापूर्वीही वनपरिक्षेत्राधिकाऱ्याने अन्य कर्मचाऱ्यांशीही अशीच असभ्य वर्तणूक केली. परंतु अधिकारी आपल्याला नाहक त्रास देतील, या भीतीने कुणीही तक्रार केली नाही. त्यामुळे संबंधित वनपरिक्षेत्राधिकाऱ्याची चौकशी करुन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वनरक्षक-वनपाल संघटनेने केली आहे. चौकशी समितीत पत्रकार, सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, मानवाधिकार समितीचे कार्यकर्ते व वनकर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश करावा,अशी मागणीही संघटनेने केली आहे.