परवानगी मोहरणा घाटाची, उपसा गवराळा घाटातून

0
7

लाखांदूर,दि.18: तालुक्यातील मोहरणा रेतीघाट नुकताच सुरू झाला असून, येथे पोकलँडने रेतीचा उपसा केला जात आहे. रेती उपसा करण्यासाठी मोहरणा घाटाला परवानगी असली तरी रेतीचा उपसा होत असलेले ठिकाण गवराळा हद्दीत येत आहे. या रेतीघाटातून टिप्परमधून क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतुक सुरू आहे.
दरवर्षी ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरावस्था होत आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या भागातील विद्यार्थी लाखांदूरला ये-जा करीत असतात. मात्र रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. मागील १५ दिवसांपूर्वी पवनी तालुक्यातील बोरगाव येथील एका मुलीचा नाहक बळी गेला होता. अशीच वाहतूक सुरू राहिली तर अशा घटनांची पुनरावृती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या परीसरात मोहरणा रेती घाटासह ईटान येथे रेती घाट सुरू आहे. दोन्ही घाटातून पोकलँडने रेतीचा उपसा करून ओव्हरलोड वाहतुक सुरू आहे. लाखांदुर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या भागातील नागरीक व विद्यार्थी नेहमीच लाखांदूरला येतजात असतात. याच मार्गाने रेतीचे ओव्हरलोड टिप्पर वाहतुक सुरू असते. रेती घाटामुळे लाखोंचा महसूल शासनाच्या घशात जमा होत असला तरी रस्त्याची मात्र वाट लागलेली आहे. ईटान घाटावर रेती उपसा करण्यासाठी परवानगी मिळालेल्या क्षेत्रातून अधिक भागात सात ते आठ मीटर रेतीचा उपसा केला जात आहे. मोहरणा रेती घाटाच्या नावाने गवराळा सिमेत उपसा सुरू आहे.