ढोल वाजवित घुसले रविभवनात, पत्रपरिषदेत ‘राकाँ’ कार्यकर्त्यांचा राडा

0
9

नागपूर, दि. 24 – : नागपुरात महिलांवरील अत्याचार वाढले असून त्या सुरक्षित नाहीत, या विषयाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रविभवनात सुरू असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या पत्रकार परिषदेत घुसून ढोल बडवित गोंधळ घातला. याबाबत सूचना मिळताच पोलीस ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी ढोलसह एकाला ताब्यात घेतले.
महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची रविवारी दुपारी १ वाजता रविभवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. परंतु ती तब्बल तासभराने उशिरा सुरू झाली. रविभवनाच्या सभागृहात आयोजित ही पत्रकार परिषद शेवटच्या टप्प्यात असताना बाहेर अचानक ढोलताशांचा आवाज होऊ लागला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्ष अलका कांबळे या आपल्या कार्यकर्त्यांसह ढोल वाजवित रविभवनात दाखल झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत लहान मुलंही होते. ढोल वाजवित त्या थेट पत्रकार परिषद सुरू असलेल्या सभागृहाच्या दारापर्यंत आल्या. पत्रपरिषद संपत आली होती. दरम्यान गोंधळ होत असल्याचे पाहून राहाटकर या ढोल वाजवणाऱ्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटल्या. त्यांचे काय म्हणणे आहे, हे ऐकून घेतले. शहरात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. पोलिसांचा धाक राहिला नाही. शासनही याबाबत गंभीर नाही, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. यावर नागपुरातील ताज्या घटनांची दखल आयोगाने घेतली आहे. इतरही काही विषय असतील तर ते आयोगाकडे द्यावे, त्यावर गंभीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देत रहाटकर यांनी त्यांची समजूत घातली. त्यानंतर त्या पुन्हा पत्रपरिषद सुरू असलेल्या सभागृहात येऊन पत्रकारांशी बोलू लागल्या. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्याच मागे ढोल बडवित सभागृहात घुसले आणि ढोल वाजवित राहिले. या गोंधळातच पत्रपरिषद संपुष्टात आली. दरम्यान पोलिसांना सूचना मिळताच ते रविभवनात दाखल झाले. त्यांनी ढोलसह एकाला ताब्यात घेतले.