नक्षलग्रस्त ११४ गावांत पोलिसांकडून विकास शांती यात्रा

0
7

गोंदिया,दि.27(खेमेंद्र कटरे) : पोलिस विभागाच्यावतीने जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त ११४ गावांत २४ ते २७ जुलैदरम्यान विकास शांती यात्रा सुरू करण्यात आली आहे. नक्षल शहीद सप्ताहाच्या पूर्वी चार दिवस विकास शांती यात्रा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त असलेल्या गावांत भ्रमण करणार आहे.आज या विकास शांती यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. देवरी,सालेकसा,आमगाव,अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील नक्षलग्रस्त आदिवासी गावामध्ये जाऊन या शांतीयात्रेच्या माध्यमातून संवाद साधला जाणार आहे.या मोहिमेत पोलिस अधिक्षक,उपविभागीय पोलिस अधिकारी,गटविकास अधिकारी,ठाणेदार यांच्यासह स्थानिक प्रशासनिक अधिकारी यांनाही सहभागी करण्यात आले आहे.गोठणगाव येथील शांती यात्री यात्रेत पोलिस अधिक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील,उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे,गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार यांच्यासह अनेक अधिकारी सहभागी झाले होते.चिचगड येथे पोलिस निरिक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनात भर पावसात शांतता यात्रा गावात काढण्यात आली.गावातील नागरिकांसह शाळकरी मुलांनी यात सहभाग घेतला.
जिल्ह्यातील ११४ नक्षलग्रस्त गावांत नक्षलवाद्यांना गावबंदी करण्यासाठी पोलीस विभागाची योजना आहे. या नक्षलग्रस्त गावातील जनता भयमुक्त रहावी, यासाठी गोंदिया जिल्हा पोलिसांनी त्यांना विकासाच्या मार्गावर नेण्याचा संकल्प केला आहे. आदिवासी जनतेच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण करण्याचे कार्य पोलीस विभाग करीत आहे. आदिवासी तरूणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे, व्यायाम शाळा व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना रेशन कार्ड, आधार कार्ड बनवून देणे, संजय गांधी निराधार योजना, वृध्दांना श्रावण बाळ योजनेचा लाभ या यात्रेच्या माध्यमातून दिला जाणार आहे.
या शांतीयात्रेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे पदाधिकारी व सदस्य सहभागी होऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहेत. गावागावातील महात्मा गांधी तंटामुक्त समित्यांनी पुढाकार घेऊन पोलिसांच्या प्रत्येक कामात सहकार्य करण्याची भूमिका ठेवली.जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींनी स्वयंप्रेरणेने नक्षलवाद्यांना आपल्या गाव बंदी करून विकासात्मक कार्याचे पाऊल उचचले.जिल्ह्यातील शंभर टक्के गावांत नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा मानस बांधून त्या दिशेने नक्षल शहीद सप्ताहाच्या पूर्वी म्हणजेच २४ ते २७ जुलै या कालावधीत नक्षलग्रस्त गावात विकास शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत जि.प., पं.स., सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, पाटबंधारे, महिला आर्थिक विकास महामंडळ अशा शासनाच्या सर्व विभागांचा सहभाग होता.