पक्षभेद विसरून ग्रामपंचायतींने दुष्काळाचा ठराव शासनाला पाठवावे :- डाॅ. तुमसरे

0
6

साकोली दि.2: भंडारा-गोंदिया हे दोन्ही जिल्हे मुख्यत्वे करून धान उत्पादक जिल्हे आहेत. मान्सून सुरू होण्यापूर्वी पुणे वेधशाळेने जिल्ह्यात सरासरी पाऊस पडण्याचे संकेत दिले होते. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही शेतक-यांनी खरीप धान पिकाची पेरणी केली. पेरणी नंतर थोड्या फार पावसामुळे प-हे कसे बसे जगले परंतु यंदाच्या मान्सूनने वेळेवर दगा दिल्यामुळे 70% टक्के रोवणे खोळंबले. ज्या लोकांकडे मोटार पंप होते त्यांचेही काही प्रमाणातच रोवणे झाले. पाऊस नसल्यामुळे विहीरी तर कोरड्या पडलेल्या आहेतच परंतू बोअरवेललाही पाणी नाही. ज्यांचे काही प्रमाणात रोवणे झाले त्यांना धान पिक जगविणे कठीण होऊन शेतकरी रडकुंडीस आलेला आहे. धान पिकं पिवळे पडून जमिनीला भेगा पडत चालल्या आहेत. ज्याच्याकडे विहीरी बोअरवेल नाहीत अशा लोकांचे प-हे मोठे झाले परंतु रोवणे करता आले नाही.भंडारा गोंदिया हे जिल्हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळख असुनही तलावात 10% टक्यापेक्षा जास्त पाणी नाही. पाण्याअभावी काही शेतक-यावर दुबार पेरणीचेही सावट आलेले असून शेतकरी चिंतातूर होऊन मेडाकुटीस आलेला आहे दुबार पेरणीचा हंगाम ही निघून गेला असल्यामुळे शेतक-यांसमोर यंदा जिवन मरणाचा यक्ष प्रश्न उभा झालेला आहे.अशा दुष्काळी कठीण परिस्थितीत शेतक-यांनी धिर न सोडता दोन्ही जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राजकीय पक्षपात विसरून एक मुखाने सुखा दुष्काळाचा ठराव घेऊन तहसिलदारांच्या मार्फत शासनाला पाठविण्याचे आवाहन डाॅ. अजयराव तुमसरे यांनी केले आहे. जिल्ह्यातील जनप्रतीनिधींनीही सुखा दुष्काळाची बाब शासनाच्या लक्षात आणून देऊन भंडारा गोंदिया हे दोन्ही जिल्हे सुखा दुष्काळ घोषीत करावे. अन्यथा शेतकरी कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या मध्ये वाढ होण्याचे नाकारता येत नाही. असेही भाकित डाॅ. अजयराव तुमसरे यांनी वर्तविलेले आहे.