साकोलीत पिकविम्यासाठी ठिय्या आंदोलन

0
7

बारा तासात तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
साकोली- पिकविमा काढण्यासाठी कालचा शेवटचा दिवस होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढता आला नाही.एकही शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने पर्यायी व्यवस्था करावी, या मागणीसाठी काल शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक तास ठिय्या आंदोलन केले.
महाराष्ट्र सरकारने पिकविम्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली होती.यानुसार, शेतकरी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गेले असता तेथील सर्वर डाऊन असल्याने शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारण्यात आले नाही. पिकविमा काढण्याची मुदत ही 4 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री पिकविमा ऑफलाइन पद्दतीने काढण्याची माहिती प्रसारमाध्यमांना देतात, तर दुसरीकडे बॅंकेचे अधिकारी लेखी आदेश नसल्याचे शेतकऱ्यांना सांगत आहेत. त्यामुळे ऑफलाइन फार्म स्विकारले जात नसल्याची माहिती आहे.
या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना शेतकऱ्यांनी निवेदन देऊन चर्चा केली. परंतु, या चर्चेतून काहीही निष्पन्न होऊ शकले नाही . परिणामी, शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर एक तास ठिय्या आंदोलन केले. यावर लवकर तोडगा काढला गेला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. या आंदोलनात अॅड, मनिष कापगते, प्रकाश कठाणे, रवी पेटकर, अशोक गुप्ता,रामकृष्ण कापगते,दिलीप खांडेकर,वसंता वंजारी,अरूण बडोले,रघुनाथ टेंभरे,धनराज बोरकर,पुरुषोत्तम लांजेवार, चरण कोटांगले मारोती पटले आदी शेतकरी उपस्थित होते.