भंडारा जिल्ह्याला विदर्भात एक नंबर करणार – चंद्रशेखर बावनकुळे

0
11

भंडारा,दि.16 : ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्या शूरवीरांना आठवण्याचा आजचा दिवस आहे. भंडारा जिल्ह्याची जबाबदारी सहपालकमंत्री म्हणून आपल्यावर असून आज स्वातंत्र्यदिनाच्या साक्षीने नागपूर सारखाच भंडारा जिल्ह्याचा विकास करण्याची जिल्हावासियांना ग्वाही देतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज घोषित केलेल्या 10 कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी करुन भंडारा जिल्ह्याला विदर्भात एक नंबर करणार असल्याचे प्रतिपादन सहपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नगर परिषद भंडाराला 150 वर्ष होत असल्याने आयोजित शतकोत्तर रौप्य महोत्सव व 121 फुट उंच ध्वजाचे ध्वजारोहन या कार्यक्रमात ते बोलत होते. 121 फुट ध्वजाचे ध्वजारोहण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, चरण वाघमारे, ॲड. रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, नगराध्यक्ष सुनील मेंढे, तुमसर नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी, उपनगराध्यक्ष रुबी चढ्ढा, मुख्याधिकारी अनिल अढागळे व भाजपा जिल्हाध्यक्ष तारिक कुरेशी उपस्थित होते.
स्थानिक गांधी चौकात आयोजित या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी बोलतांना श्री. बावनकुळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत सर्वाधिक लाभ भंडारा जिल्ह्याला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचा कृषी विकास दर वाढविण्याला प्राधान्य राहणार आहे. भंडारा शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी 110 कोटीची योजना तयार असून एका वर्षात ती कार्यान्वित होईल.
शहरातील भूमिगत वीज जोडणीसाठी प्रयत्न केला जाणार असून भूमिगत गटार योजना करण्यावर लवकर निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. नगर परिषदेने 121 फुट ध्वज उभारुन देशभक्तीची आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक व्यक्तींनी आपल्यातील चांगल्या गुणांचा उपयोग राष्ट्र व महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
नगर परिषदेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या लोगोचे अनावरण यावेळी श्री. बावनकुळे यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमामागची संकल्पना नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी प्रास्ताविकातून सांगितली. उपस्थितांचे आभार मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी मानले.यावेळी शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त विविध देशभक्तीपर नृत्याचे कार्यक्रम नगर परिषदेच्या शाळांनी सादर केले. प्रारंभी शालेय विद्यार्थींनी स्वागत गीत सादर करुन मान्यवरांची मने जिंकली.