राष्ट्रीय जंतनाशक मोहीम जिल्ह्यात

0
29

गोंदिया,दि.१८ : जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेमध्ये १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी (अल्बेंडाझोल ४०० एम.जी.) देण्यात येणार आहे. १ ते ६ वर्षे वयोगटातील शाळेच्या पटावर नसलेल्या सर्व मुले व मुलींना अंगणवाडी मार्फत गोळ्या देण्यात येईल. जंताचे तीन प्रकार असून राऊंड वर्म, व्हिप वर्म व हुक वर्म असे आहे. जंतसंसर्गाचा बालकांच्या रक्तक्षय, अतिसार, मळमळणे, भूक मंदावणे, थकवा व अस्वस्थपणा, कुपोषण, शौचाच्या वेळेस रक्त पडणे, पोटाला सुज येणे इत्यादी परिणाम मुलांच्या आरोग्यावर होवू शकतात. त्याकरीता १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती,‍िशक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्याकरीता ही मोहीम राबविण्यात येत आहे.
अल्बेंडाझोल जंतनाशक गोळीची मात्रा ४०० मि.ग्रॅ. असून १ ते २ वर्ष वयोगटात अर्धी गोळी (२०० मि.ग्रॅ.) व ३ ते १९ वर्ष पूर्ण गोळी (४०० मि.ग्रॅम) विनामूल्य देण्यात येईल. मोहीम राबविण्यासाठीच्या संस्था- सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानीत शाळा, आश्रमशाळा, नगरपालिका व सर्व खाजगी अनुदानीत शाळा, सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्र. मोहीम राबविण्यासाठी शाळांची संख्या १४५५ व अंगणवाडीची संख्या १७९५ आहे.
लाभार्थी संख्या १ ते ५ वयोगटातील ग्रामीण भागातील बालके ८३७७५ व शहरी भागातील बालके ८४७० असे एकूण ९२२४५ बालके अंगणवाडी स्तरावरील आहेत. ६ ते १९ वयोगटातील सर्व शाळेत जाणारे ग्रामीण भागातील बालके २१२१५६ व शहरी भागातील बालके ३०५७३ आहेत. १ ते १९ वयोगटातील मुले व मुली ३२६५०४ आहेत. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेची अंमलबजावणी करणारे विभाग- सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग,‍ शिक्षण विभाग व आदिवासी विभाग आहेत.
जिल्हा टास्क फोर्स समितीची सभा १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, तसेच जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, आदिवासी प्रकल्प कार्यालय देवरीचे व्ही.व्ही.तितीरमारे, जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्वच बालकांना जंतनाशकाच्या गोळ्या देणे गरजेचे असून जंतनाशक गोळ्यापासून एकही बालक सुटू नये असे आवाहन केले.