कोतवाल भरती परिक्षा सप्टेंबरला होणार नव्याने

0
47

अर्जुनी मोरगाव,दि.21 – उपविभागातंर्गत येणार्या गावासांठी रविवारला होणारी कोतवाल भरती परिक्षा तांत्रिक कारण पुढे करून ऐनवेळी रद्द करून ती पुढे ढकलण्यात आल्याचे प्रकरण अर्जुनी मोरगाव तालुक्यात घडले आहे. ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने तालुक्यात अनेक शंका कुशंकांना पेव फुटले असून परिक्षा देण्यासाठी वेळेवर आलेल्या २५७ अर्जदारांना परिक्षा रद्द झाल्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागला.दरम्यान ही परिक्षा 10 सप्टेंबरला नव्याने घेण्यात येणार असून त्याच दिवशी निकाल गुणवत्तेनुसारच प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, अर्जुनी मोरगाव तालुक्यात १३ साझ्यासाठी आरक्षणानुसार १३ कोतवाल पदासाठी लेखी व तोंडी परीक्षा २० आॅगस्ट रोजी घेण्यात येणार होती. सदर परीक्षेसाठी १३ कोतवाल पदासाठी यापूर्वीच अर्ज मागविण्यात आले होते. तालुक्यात १३ जागासाठी २७४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यामधून २५७ अर्ज परीक्षेसाठी पात्र ठरले होते. सदर परीक्षेसाठी तालुक्यात २५७ अर्जदारांना परीक्षेचे प्रवेशपत्रही पाठविण्यात आले होते. २० आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जि.प.हायस्कूल अर्जुनी मोरगाव येथे परीक्षेचे ठिकाण निश्चित करण्यात आले होते. सर्व परीक्षार्थी तयारीनिशी परीक्षा केंद्रावर हजरही झाले. मात्र, ऐनवेळी ही परीक्षा ११ वाजेऐवजी दुपारी २ वाजता घेण्यात येईल असे नोटीस तालुका प्रशासनातर्फे लावण्यात आले. मात्र, लगेचच होणारी कोतवाल भरतीची परीक्षा काही तांत्रिक कारणामुळे रद्द करून पुढे ढकलण्यात आली असून यापुढे ही परीक्षा १० सप्टेंबरला घेण्यात येणार असल्याचे नोटीस लावण्यात आली. ऐनवेळी परीक्षाच रद्द झाल्याने परीक्षार्थ्यांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली.परीक्षेसाठी तालुका प्रशासनातर्फे परीक्षेची संपूर्ण तयारी झाली होती. प्रश्न पत्रिका, बैठक व्यवस्था, परीक्षार्थींचे रोल नंबर, परीक्षा घेणारे व पेपर तपासण्यापासून सर्व कर्मचाºयांची नेमणूकसुद्धा करण्यात आली. सर्व व्यवस्था सुरळीत असताना ऐनवेळी तांत्रिक बाब समोर करून ही परीक्षाच रद्द करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. कोतवाल पदाच्या परीक्षेसाठी तांत्रिक बाब सांगण्यात आली असली तरी या १३ जागांसाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार व सेटींग लावण्यात आल्याच्या चर्चा तालुक्यात आहेत. या भरती संदर्भात तालुक्यात दलाल सक्रीय झाल्याच्या चर्चा असून एका पदासाठी ३ ते ४ लाखापर्यंत बोली गेली असल्याच्या चर्चा रंगु लागल्या आहेत. मग हे दलाल कोण? व त्यांना कुणी सांगितले हा प्रश्न अद्याप कायम आहे. या सर्व बाबींचा विचार करून एका जबाबदार पदाधिकाºयाने कोतवाल भरती प्रक्रिया रद्द करण्याचे भ्रमनध्वनीद्वारे सांगितल्याच्या चर्चा सुरू आहेत.