उत्तम आरोग्य सेवा पोहोचणे प्रगतीशील शासनाचे कर्तव्य -आ.अग्रवाल

0
16

गोंदिया,दि.27 : समाजातील प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचणे प्रगतीशील शासनाचे कर्तव्य आहे. आरोग्य सेवा खरी मानव सेवा आहे. काँग्रेस शासनाच्या नेतृत्वात आम्ही तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न केला व सर्वांच्या सहकार्याने यात आम्ही यशस्वी ठरलो, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
दासगाव बु. येथे रोगनिदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, रजेगाव येथे ग्रामीण रूग्णालयाची स्थापना व खमारी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा दर्जा वाढवून प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यातच गोंदिया तालुक्यातील कासा, तेढवा, कुडवा, सिरपूर, सावरी, महालगाव, मरारटोला, लहीटोला, कटंगटोला आदी गावांमध्ये नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची स्थापना करण्यात आली.
परंतु गोंदिया तालुक्याला विकासाच्या नवीन मार्गापर्यंत पोहोचविणारी सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आहे. यात विद्यार्थ्यांना कमीतकमी दरात मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल व या ५०० खाटांच्या क्षमतेच्या रूग्णालयात जगात उपलब्ध सर्व प्रकारच्या उपचारांची सोय होईल. त्यामुळे रूग्णांना कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी नागपूर-मुंबई जावे लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.
या वेळी पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.सदर रोग निदान शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून ईसीजी, ब्लड प्रेशर, मधुमेह, नेत्ररोग, दंतरोग, चर्मरोग, गरोदर मातांची तपासणी व कुपोषित बालकांची तपासणी करण्यात आली.यावेळी प्रामुख्याने प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रफुल अग्रवाल, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. रूखमोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश रहमतकर, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, जि.प. सदस्य रजनी गौतम, पं.स. सदस्य अनिल मते, आनंद तुरकर, आशीष चव्हाण, रूद्रसेन खांडेकर, लक्ष्मी रहांगडाले, सरपंच कविता मेश्राम, उपसरपंच दिलीप मिश्रा आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.