मुर्रीत आढळले डेंग्युचे रुग्ण ग्रामपंचायतीचे स्वच्छतकडे दुर्लक्ष

0
11

गोंदिया,दि.27 : नगरपरिषद क्षेत्राला लागून असलेल्या मुर्री गावात डेंग्यूचे रूग्ण आढळल्याने ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेचे पुर्ण वाभाडे निघाले आहेत.सोबतच आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुर्री येथील ज्यांना डेंग्यूची लागण झाली आहे,त्यापैकी एकाला गोंदिया शहरातील खासगी रूग्णालयात तर दुसºयाला नागपूर येथे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छोटा गोंदिया परिसरातील रहिवासी शितल उपेंद्र शनवारे (२८) व लगतच्या ग्राम मुर्री येथील रहिवासी कैवल्य पंकज लिचडे (५) यांना डेंग्यूची लागण झाली आहे. यातील शितल शनवारे यांना शुक्रवारी ताप आल्याने येथील डॉ. गिरी यांच्याकडे तपासणी केली असता त्यांच्या प्लेटलेट्स कमी झाल्याचे कळल्याने भर्ती करण्यात आले आहे.
तर कैवल्य लिचडे याला २२ तारखेला ताप आला व त्याची डॉ. सावजी यांच्याकडे तपासणी केली असता प्लेटलेट्स कमी झाल्याने त्याला २३ तारखेला नागपूरच्या डॉ. देवपुजारी यांच्याकडे भरती करण्यात आल्याची माहिती कैवल्यच्या पालकांनी दिली आहे.तपासणीमध्ये डेंग्यू असल्याचा पाझिटिव्ह रिपोर्ट आल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय आणखी काही रूग्ण असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही परिस्थिती बघता शहर व लगतच्या मुर्री या गावात डेंग्यू आपले पाय पसरत असल्याचे म्हणता येईल.विशेष म्हणजे लिचडे कुटुबियांनी ग्रामपंचायतीकडे परिसर स्वच्छतेची मागणी केली असता ग्रामपंचायत प्रशासनाने उलट त्यांना आम्हाला जेव्हा स्वच्छता करायचे असेल तेव्हा करु आपण गप्प रहा अशा सल्ला दिल्याचीही माहिती समोर आली आहे.यावरुन ग्रामपंचायतीचे गावातील स्वच्छतेकडे किती लक्ष आहे हे बघावयास मिळते.हिवताप विभागाकडून मागील काही वर्षांत जिल्ह्यात डेंग्यू नसल्याचे सांगीतले जात आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, जिल्ह्यात डेंग्यू पेक्षा मलेरिया जास्त धोकादायक आहे. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरत असल्याचे मुर्री येथील आलेल्या प्रकारावरुन म्हणता येईल.दरम्यान डेंग्यूचा रूग्ण आढळल्याची माहिती मिळताच जिल्हा हिवताप विभागाकडून मुर्रीत फॉगींग व नाल्यांत फवारणीचे काम सुरू करण्यात आले. शिवाय तापाचे रूग्ण शोधून त्यांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले आहेत