दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ग्रा.प.निवडणुका पुढे ढकला-परशुरामकर

0
14

गोंदिया,दि.07-गोंदिया जिल्ह्यात भिषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना निवडणुक आयोगाने जिल्ह्यातील 348 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.या निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा ही अंदाजे दोन महिने निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणार त्यामुळे दुष्काळ संबधी करावयाच्या उपाययोजनासह पीक पाण्याच्या सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष होणार असल्याने संकटात असलेल्या शेतकरी व शेतमजुराला अडचणीचा सामना करावा लागणार आहे.त्यामुळे निवडणुक आयोगाने गोंदिया जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता काही काळासाठी या निवडणुका पुढे ढकलण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.परशुरामकर यांनी जिल्हाधिकारीमार्फेत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून जिल्ह्यात फक्त 808 मि.मि पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या 54 टक्के पाऊस पडला आहे.त्यातच 70 हजार हेक्टर जमिनीवर अद्यापही रोवणी झालेली नाही.उच्चप्रतीचे धान बियाणांचे पर्हे टाकले ते सुध्दा करपू लागले आहेत.अशा परिस्थितीमध्ये या सर्व शेताचे व पिकांचे तातडीने सर्वेक्षण होणे गरजेचे असून त्यासाठी महसुल विभागाचे तलाठी,मंडळ अधिकारी,कृषी अधिकारी यांची मदत लागणार आहे.परंतु निवडणुक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केल्याने हे सर्व त्यामध्ये व्यस्त झाल्यास शेतपिकाचे पंचनामे होऊ शकणार नाही व शासनाला वास्तविक माहिती जाणार नाही.त्यामुळे शेतकरी व शेतमजुराचे मोठे नुकसान होण्याची भिती असल्याने निवडणुक आयोगाने सुध्दा याकडे लक्ष देऊन तत्काळ ग्रामपंचायत निवडणुकांना स्थगिती द्यावी अशी मागणी परशुरामकर यांनी केली आहे.