आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- शेखर चन्ने

0
15

ग्रा.पं.सार्वत्रिक निवडणूक आढावा बैठक
गोंदिया,दि.६ : येत्या १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत सरपंच पदाची निवडणूक ही थेट मतदारातून होणार आहे. त्यामुळे या निवडणूकीला महत्व प्राप्त झाले आहे. निवडणूकीत पैशाचा व दारुचा वापर होणार नाही यादृष्टीने निवडणूक यंत्रणेने दक्ष राहावे. ही निवडणूक शांतता व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी दिले.
आज ६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात येत्या १६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात होणाऱ्या ३४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक तयारीचा आढावा घेतांना श्री.चन्ने बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.चन्ने म्हणाले, प्रत्येक तहसिल कार्यालयात तयार करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्षात येणाऱ्या लोकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घ्यावी. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नियंत्रण कक्षाचा नंबर हा दर्शनी भागात लावावा. त्यामुळे नागरिकांना निवडणूकीबाबतच्या तक्रारी थेट नियंत्रण कक्षाला करता येईल. राष्ट्रीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या व नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक यंत्रणेनी सतर्कतेने काम करावे.
निवडणूक खर्चाचा हिशोब सरपंच व सदस्य पदाचे उमेदवार हे वेळेवर सादर करतील याकडे लक्ष दयावे असे सांगून श्री.चन्ने म्हणाले ज्या ग्रामपंचायतीमध्ये जास्त खर्च होण्याची शक्यता आहे त्या ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष दयावे. सरपंच व सदस्य ज्या ग्रामपंचायतीमधून बिनविरोध निवडून आले आहेत त्यामागची कारणे शोधावीत. गावपातळीवर काम करणारे स्थानिक पोलीस पाटील व कोतवालाची या कामासाठी मदत घ्यावी असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री.काळे म्हणाले, थेट सरपंचाची निवडणूक मतदारातून होणार असल्यामुळे प्रशासन सजग राहून काम करीत आहे. कोणत्याही गावात निवडणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टीने नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.भूजबळ म्हणाले, गोंदिया जिल्हा हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे पोलीस प्रशासन अत्यंत सतर्क राहून काम करीत आहे. जिल्ह्यात नलक्षदृष्ट्या ५९ मतदान केंद्र ही अतिसंवेदनशील आहेत तर ८८ केंद्र संवेदनशील आहेत. शांततेत व निर्भय वातावरणात ही निवडणूक पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूकीच्या तयारीची माहिती देतांना उपजिल्हाधिकारी श्रीमती आंधळे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणूकीत मतदान यंत्राद्वारे मतदान होणार असल्यामुळे ११८९ कंट्रोल युनिट व २६०९ बॅलेट युनिट उपलब्ध झाली आहे. या निवडणूकीत १०८१ मतदार केंद्र राहणार आहेत. या मतदान केंद्रात २ लाख ५१ हजार ३१४ स्त्री आणि २ लाख ५१ हजार ८८६ पुरुष असे एकूण ५ लाख ३ हजार २०० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या सभेला निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी अशोक लटारे(देवरी), अनंत वालस्कर(गोंदिया), गंगाराम तळपाडे(तिरोडा), तहसिलदार सर्वश्री रविंद्र चव्हाण(गोंदिया), कल्याणकुमार डहाट(गोरेगाव), विठ्ठल परळीकर(सडक/अर्जुनी), देवदास बोंबार्डे(अर्जुनी/मोरगाव), संजय रामटेके(तिरोडा), प्रशांत सांगडे(सालेकसा), साहेबराव राठोड(आमगाव), विजय बोरुडे(देवरी) यांची उपस्थिती होती.
आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्ष
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी आचारसंहितेबाबत कुणाच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी जिल्हा व तालुका स्तरावर असलेल्या आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्षातील दूरध्वनीवर संपर्क साधावा. जिल्हाधिकारी कार्यालय ०७१८२-२३०१९६, टोल फ्री क्रमांक १०७७. तहसिल कार्यालय गोंदिया ०७१८२-२३६७०३, तहसिल कार्यालय गोरेगाव ०७१८७-२३२३३०, तहसिल कार्यालय तिरोडा ०७१९८-२५४१५९, तहसिल कार्यालय अर्जुनी/मोर ०७१९६-२२०१४७, तहसिल कार्यालय देवरी ०७१९९-२२५२४१, तहसिल कार्यालय आमगाव ०७१८९-२२५२१८, तहसिल कार्यालय सालेकसा ०७१८०-२४४१३६ व तहसिल कार्यालय सडक/अर्जुनी ०७१९९-२३३२४० या क्रमांकावर संबंधित तालुक्यातील मतदारांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या आचारसंहिते बाबतच्या काही तक्रारी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे.