मोदी, फडणवीसांनी इंदिराजींच्या कार्यक्रमांवर बंदी लावली-कुमार केतकर

0
14

नागपूर,दि.8 : ज्या देशाच्या पंतप्रधान म्हणून इंदिराजींनी १७ वर्षे काम केले, त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे सौजन्य सध्याचे सरकार दाखवित नाही. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर शासकीय कार्यालयांमध्ये इंदिराजींचे कार्यक्रम घेऊ नका, असे आदेशच काढले आहेत. नेहरू, इंदिराला विरोध करणारे हे लोक २०१९ मध्ये पुन्हा सत्तेत आले तर देशाचा इतिहास बदलतील. देशाला स्वातंत्र्य गांधींनी नव्हे तर गोळवलकर गुरुजींनी मिळवून दिले, असा इतिहास पाठ्यपुस्तकातून शिकवतील. काँग्रेसमुक्त देश करण्याच्या घोषणा देऊन यांना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासच पुसायचा आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केली.
धनवटे नॅशनल कॉलेज व राजीव गांधी स्टडी सर्कलतर्फे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अनंतराव घारड, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष शरद वानखेडे, नीलेश कोढे उपस्थित होते. केतकर म्हणाले, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात झालेली सर्व कामे पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिन्यातून एकदा ‘मन की बात’ करून मोठे होण्याचा पंतप्रधान मोदी यांचा भ्रम लवकरच दूर होणार आहे. नेहरू, इंदिरा, राजीव यांना स्वातंत्र्य लढ्याचा व राष्ट्रउभारणीचा एक इतिहास आहे. राहुल गांधी यांच्यावर सातत्याने टीका करून हा वारसा संपविण्याचा प्रयत्न होत आहे. जे लोक लष्करी हुकूमशाही मानणारे आहेत, तेच लोक लोकशाहीच्या मार्गाने सत्तेत आले असून आता हुकूमशाही लादू पाहत आहेत. अनिवासी भारतीयांनी स्वांतंत्र्याचा लढा समृद्ध केला, हे राहुल गांधी यांनी केलेले विधान बरोबर आहे. आरएसएसची संकल्पनाही एनआरआय कडूनच घेण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला.
इंदिराजींना २८२ जागा मिळाल्या तेव्हा काँग्रेसला ४१ टक्के मते मिळाली होती. मोदींना २८२ जागा मिळाल्या तेव्हा भाजपाला ३१ टक्के मते मिळाली आहेत. मोदींच्या भूलथापांमुळे भाजपाला अतिरिक्त १०० जागा मिळाल्या. आता भ्रमनिरास होऊन ही मते माघारी फिरत आहेत. शायनिंग इंडियाच्या वेळी प्रमोद महाजन ३५० जागा जिंकणार असल्याचे सांगत होते. प्रत्यक्षात १३८ जागा आल्या. आताही भाजपाची अपेक्षा तेवढीच आहे. मात्र, १८० वर जागा मिळणार नाही. तसे झाले तर संघच मोदींना बदलण्याची मागणी करेल. कारण, नियोजन आयोगाप्रमाणे मोदी रेशीमबागही विसर्जित करून टाकतील, अशी संघाला भीती आहे, असेही केतकर म्हणाले.