महाराष्ट्र एक्सप्रेस वाढवा आमगावपर्यंत-खा.नेते

0
11

गोंदिया,दि.04ः-जिल्ह्यातील सालेकसा व आमगाव या गडचिरोली लोकसभा क्षेत्रात येणार्‍या दोन तालुक्यातील रेल्वे विभागाशी संबधित मागण्या व समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात, त्या अनुषंगाने रेल्वेसह महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करावे, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी रेल्वे विभागाचे अधिकारी तसेच महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.सकाळी १0 ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत गोंदिया ते दुर्गपर्यंत एकही लोकल रेल्वेगाड्या धावत नाही. यासाठी रेल्वे विभागाने एक रेल्वेगाडी सुरू करावी या मागणीवरही चर्चा करण्यात आली. दरम्यान रेल्वेच्या अधिकार्‍यांनी यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाला पत्र देण्यात आले असे सांगितले. महाराष्ट्र व विदर्भ हे दोन रेल्वेगाड्या आमगावपयर्ंत विस्तारीत करण्यात यावे, या मागणीवरही चर्चा करण्यात आली. परंतु, या दोन्ही मागण्यांवर रेल्वेच्या अधिकार्‍यांनी नियमात बसत नसल्याने असहमती दर्शविली.
रेल्वे विषयक समस्या व मागण्यांना घेवून १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वेचे अधिकारी व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांची समन्वय सभा घेण्यात आली. दरम्यान विविध विषयांवर चर्चा करीत त्या समस्या त्वरित मार्गी लावण्यात यावे, असे निर्देश दिले.सालेकसा तालुक्यातील धनेगाववासीयांना रेल्वेच्या आडकाठीमुळे फक्त ८00 मीटर अंतरचे रस्ते नसल्याने २५ किमी अंतराचा अधिक प्रवास करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने रस्ता बांधकामाची मंजूरी द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. या विषयावर चर्चा करताना रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सदर रस्ता शासनाने तयार करावा, याकरीता रेल्वेची नाहरकत राहणार आहे, असे स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच दोन्ही विभागाने रस्ता बांधकामासंदर्भात प्रस्ताव तयार करावे, असे खासदार नेते यांनी निर्देश दिले.
यानंतर आमगाव रेल्वे स्थानकावरील अशुध्द पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान रेल्वे स्थानकावर जलशुध्दीकरण यंत्र लावण्यात आले असल्याची माहिती रेल्वे अधिकार्‍यांनी दिली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपजिल्हाधिकारी ठाकरे, रेल्वेचे एडीआरएम अहिरवार, सिनियर डीसीएम अर्जुन सिब्बल, सिनियर डीओएम शर्मा, सिनियर डीईएन (पूर्व) अशोक सूर्यवंशी, घनश्याम अग्रवाल, जगदिश शर्मा, रवी भेंडारकर, हितेश डोंगरे आदि उपस्थित होते.