भंडारा महिला रुग्णालयासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण

0
11

भंडारा,दि.15 : जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालय बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. बालक दिनाच्या मुहूर्तावर प्रस्तावित जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया भंडाºयाचे तहसीलदार संजय पवार आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रविशेखर धकाते यांनी कागदाचे देवाणघेवाण रुपात पुर्ण केली.
भंडारा सहदुय्यम निबंधक कार्यालयात या जागेची रजिष्ट्री करण्यात आल्यानंतर डॉ.धकाते यांनी ही माहिती आरोग्यमंत्री व  जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ.दिपक सावंत, जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना दिली. यावेळी जमिन हस्तांतरणाच्या स्टँम्प पेपरवर शंभर खाटांच्या महिला व बाल रूग्णालय बांधकामासाठी सदर जमिन ९९ वर्षाच्या लीजवर निशुल्क देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यात जमिन मालक म्हणून महसूल विभागाच्यावतीने तहसीलदार संजय पवार आणि जमिन हस्तांतरक म्हणून रूग्णालयाच्यावतीने जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.रविशेखर धकाते यांच्या स्वाक्षरी आहेत.
जमिनीचे मालकी हस्तांतरण झाले असले तरी यापूर्वीच रूग्णालय बांधकामाकरीता प्रशासकीय मंजुरी मिळाली असून ४३.८४ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात पुरवणी यादीत २५ लाख रूपयांची तातडीने तरतूद करण्यात आली होती. आता रूग्णालयाच्या बांधकामासाठी भूमिपूजन लवकर होणे गरजेचे आहे.