आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन विकासाच्या प्रवाहात यावे- पालकमंत्री बडोले

0
20

देवरीत शासकीय वसतीगृहाचे भूमीपूजन
गोंदिया,दि.२८ : आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तालुक्यात वसतीगृह असले पाहिजे यासाठी आपण आग्रही आहोत. आदिवासी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन विकासाच्या प्रवाहात यावे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
२६ जानेवारी रोजी देवरी येथे शासकीय आदिवासी मुलांच्या दोन वसतीगृहाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती सविता पुराम, पंचायत समिती सभापती कामेश्वर निकोडे, जि.प.सदस्य राजेश चांदेवार, पार्वताबाई चांदेवार, पं.स.सदस्य सुनिता गावळकर, देवरीचे सरपंच कृष्णदास चोपकर, भाजपा तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार, सेवानिवृत्त जिल्हा‍ माहिती अधिकारी श्रावण कोरेटी यांची उपस्थिती होती.
दोन्ही वसतीगृहाच्या बांधकामावर ४ कोटी ४२ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून २५० विद्यार्थ्यांना निवासाची व भोजनाची व्यवस्था या वसतीगृहात उपलब्ध होणार आहे.
पालकमंत्री बडोले म्हणाले, राज्यातील आदिवासी, दलित, विमुक्त जाती भटक्या जमातींच्या समस्या सारख्याच आहेत. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या आशा आकांक्षा पालकमंत्री झाल्यामुळे पल्लवीत झाल्या आहेत. त्यांच्या आशा आकांक्षाची पुर्तता करणे माझे कर्तव्य आहे.
आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगडचा विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यातील आदिवासी आणि अनुसूचित जातीच्या ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींना येत्या वर्षात सायकलींचे वाटप करण्यात येईल. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी पाच वर्षाचा विकास आराखडा तयार करण्यात येईल. तसेच अपुर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना आमदार संजय पुराम म्हणाले, वसतीगृहाच्या निर्मितीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना चांगली सुविधा भविष्यात मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने चांगले शिक्षण घ्यावे यासाठी हे वसतीगृह निर्माण होणार आहे. वन विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी जमीन उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला आदिवासी आश्रमशाळांचे शिक्षक, आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे यांनी केले. संचालन शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.बी.बेले यांनी केले. आभार सहायक प्रकल्प अधिकारी श्री.राघोर्ते यांनी मानले.