हलबा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मशाल मोर्चा

0
15

गडचिरोली, दि.19: हलबा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय हलबा जमात महामंडळ व हलबा जमात संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हलबा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मशाल मोर्चा काढला. सुरुवातीला इंदिरा गांधी चौकातील सभागृहात समाजबांधवांची सभा झाली. त्यानंतर आमदार विकास कुंभारे, राष्ट्रीय हलबा जमात महामंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, शिवसेनेच्या महिला आघाडीप्रमुख छायाताई कुंभारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

भारतीय संविधानातील अनुच्छेद ३४२ नुसार हलबा जमातीला आरक्षण देण्यात आले आहे. परंतु राज्य व केंद्र शासनाकडून मागील २५ वर्षांपासून हलबा समाजातील शेतकरी, मजूर, विद्यार्थी व युवक, युवतींना शासकीय योजनांपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे समाज हलाखीचे जीवन जगत असून, हा अन्याय दूर करावा, अशी मागणी हलबा समाजबांधवांनी केली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर आदिवासी विकास राज्यमत्री अम्ब्रिशराव आत्राम यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात महादेवराव कुंभारे, सुचिता धकाते, आरती बोकडे, नीलिमा तळोधीकर, किरण निखारे, वैशाली हुस्के, वैशाली धकाते, शीला सोरते, भारती बोकडे, सुषमा नंदनवार, सरिता कुंभारे यांच्यासह विविध भागातून आलेले हलबा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.