आघाडी नाही, हे शिवशाहीचे सरकार आहे-एकनाथ शिंदे

0
12

अर्जुनी मोरगाव : आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षात पापं केलीत. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, महागाई वाढली. शिवसेना ही वंचितावरील शोषण ऐकून घेते. समाजातील सुखदु:ख जाणून घेते. जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत त्याच्या पाठीशी राहून मदतीचा हात देते ही शिवसेनेची शिकवण आहे. सत्तेत असलो तरी जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडू असे हे आघाडी नव्हे, तर शिवशाहीचे सरकार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (दि.२९) स्थानिक पंचायत समितीच्या पटांगणावर केले.
शिवसंपर्क अभियानांतर्गत आयोजित जिल्हा शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात विशेष अतिथी म्हणून नाशिकचे खा.हेमंत गोडसे उपस्थित होते. यावेळी मंचावर जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे, शैलेष जायस्वाल, संजय पवार, जि.प.सदस्यकिरण कांबळे, राजेश चांदेवार देवरी, सोहन क्षिरसागर सालेकसा, सुरेंद्र नायडू आमगाव, राजेंद्र चामट तिरोडा,सुनील लांज़ेवार गोंदिया, सुनील मिश्रा देवरी, सुनील पालांदूरकर, सदाशीव विठ्ठले, सडक अर्जुनी, कुलतारसिंह भाटीया, राजू बोम्बाडे गोरेगाव, अर्जुनसिंह बैस सालेकसा व वंदना डोये उपस्थित होते. यावेळी ना.एकनाथ शिंदे व खा.हेमंत गोडसे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
ते पुढे म्हणाले, सत्तेत आल्यानंतर योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत काय? त्याची निट अंमलबजावणी होते किंवा नाही,लोकांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिव संपर्क अभियानांतर्गत पाठविले आहे. विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळाचे चित्र वेगळे नाही. आघाडी सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या करतो आहे. हे थांबविण्याच्या दृष्टीने विदर्भ व मराठवाड्यात काम सुरू झाले आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे व शेतकरी आत्महत्येवर प्रतिबंध घालणे यासाठी उद्धव ठाकरे सत्तेत सामिल होण्याचा निर्णय घेतला.
विदर्भात ८५ टक्के बेरोजगार युवक आहेत. एमआयडीसी व उद्योगधंद्यांना चालना मिळण्यासंदर्भात संबंधित मंत्र्यांशी बोलणी करू.धानाला भाववाढ, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, रिक्त पदांचा अनुशेष, पर्यटनाला चालना, ब्रिटीशकालीन आणेवारी पद्धतीत सुधारणा यावर चर्चा घडवून आणण्याची ग्वाही त्यांनी दिली. शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवून जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. कार्यकर्ता जपला पाहिजे, सुखदु:ख समजून घेतली पाहिजे तेव्हाच तो जीवाची बाजी लावून पक्ष वाढवितो.गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक हे धोरण अवलंबावे. आगामी काळात जि.प. व पं.स.च्या निवडणुका आहेत. या जिल्ह्यातून अपेक्षित काम झाले पाहिजे. प्रत्येक निवडणूक ही जिंकायचीच आहे. या निर्धाराने कामाला लागून शिवसेना मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ.दिलीप काकडे यांनी केले. प्रास्ताविक शैलेष जायस्वाल यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी यादव कुंभरे, आनंद जायस्वाल, अजय पालीवाल, बबन बडवाईक, विजय खुणे, सुरेश ठवरे, सुधीर साधवानी, क्रिष्णा आगाशे, लैलेंद्र शिवणकर, मोरेश्‍वर सौं’रकर, अश्‍विन गौतम, प्रकाश उईके, कोमल सयाम, संजय लांबकाने, ज्ञानदेव कापगते, चेतन दहीकर आदींनी सहकार्य केले.

<>