शहीद सुरेश गावडे यांना पोलिस मुख्यालयात अखेरची मानवंदना

0
11

गडचिरोली,दि.२५ :- उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना काल २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कोरची तालुक्यातील कोटगुल येथील आठवडी बाजाराजवळ नक्षल्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात जिल्हा पोलिस दलाचे पोलिस हवालदार सुरेश गावडे शहीद झाले. त्यांना आज जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर दुपारी १ वाजता पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना  तसेच शोकसलामी देण्यात आली.  यावेळी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडण्यात आल्या.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आ. कृष्णा गजबे, अतिरिक्त पोलीस महासंचालक (नक्षल विरोधी अभियान) कन्नकरत्नम, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान) शरद शेलार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, हरी बालाजी, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे, पोलिस उपमहानिरीक्षक सीआरपीएफचे टी. शेखर. एसआरपीएफचे कमांडंट सुनिल फुलारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, १९२ बटालियनचे कमांडंट मनोजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्यासह सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शहीद सुरेश गावडे हे आरमोरी तालुक्यातील भाकरोंडीनजीकच्या कोसुमटोला येथील मूळ रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मला, मुलगा, २ मुली व लहान भाऊ असा परिवार आहे. यावेळी शहीद गावडे यांचे मित्रमंडळी, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस मुख्यालयाच्या पटांगणावर शहीद जवान गावडे यांना अखेरची मानवंदना देऊन वरिष्ठ अधिकाºयांनी शहीद जवान सुरेश गावडे यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनीही शोक संदेशाद्वारे शहीद कुटुंबीयांचे सात्वन केले.  पोलीस अधिकारी कर्मचाºयांतर्फे शोकशस्त्र मानवंदना देऊन त्यांचे पार्थिव अंत्यविधीकरिता त्यांच्या स्वगावी रवाना करण्यात आले.

शहीद सुरेश गावडे हे वयाच्या २० व्या वर्षी १९९५ मध्ये गडचिरोली पोलिस दलात रूजू झाले. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात ३७ वर्ष कर्तव्य बजावले. सुरेश गावडे यांच्या कुटुंबियांना सांत्वना देत  जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी गावडे यांच्या परिवारासोबत संपूर्ण पोलिस विभाग आहे, असा विश्वास पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.