रायपूर येथे पंधरा विद्यार्थ्यांना अचानक ग्लानी

0
9

बुलडाणा,दि.28 : जवळच असलेल्या रायपूर येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर सविंधान दिन कार्यक्रमादरम्यान १५ विद्यार्थ्यांना अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, यातील सात विद्यार्थ्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तर नऊ विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील तीन मुलींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात विद्यार्थ्यांना बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील शिवाजी शाळेत संविधान दिनाचा कार्यक्रम २७ नोव्हेंबर रोजी सुरू होता. कार्यक्रमादरम्यान अचानक १५ विद्यार्थ्यांना चक्कर आल्यामुळे ते जमिनीवर कोसळले.  त्यात १३ मुली व २ मुलांचा समावेश आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. शाळेलगतच रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्र  असल्याने या विद्यार्थ्यांना लगोलग शाळेतील शिक्षकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.यावेळी  वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ यांनी प्राथमिक उपचार करून त्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी बुलडाणा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
यावेळी काही विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असलेल्या विद्यार्थ्यांपैकी अधिक त्रास होणाºया वैष्णवी संदीप शिरसाट (रा. रायपूर), अंकिता सुनील सरकटे (रा. रायपूर), कोमल गजानन इंगळे या तीन मुलींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पूजा दिलीप शिरसाट, साक्षी दिलीप लहाने, विवेक पवन घाडगे, हर्षल रमेश घाडगे, पूनम उद्धव चिकटे, ऋतुजा संतोष लहाने, पूनम रमेश सावळे, गीता नारायण सरोदे, पूनम हरिदास सोनुने, निकिता सुनील सरकटे, वैष्णवी नरसिंग चिकटे, स्नेहल संजय चिकटे यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले.