विद्यापीठात पाच हजारांवर बी. फॉर्मची नोंदणी

0
13

नागपूर,दि.2 – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदवीधर गटातील दहा जागांच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी बी. फॉर्म भरण्याची तारीख दोन डिसेंबरपर्यंत देण्यात आली.

त्यानुसार उद्या शनिवार (दि. २) बी. फॉर्म भरण्याचा शेवटला दिवस आहे. मात्र, यावर्षी नव्या कायद्याचा आधार घेत, बी. फॉर्म भरताना जुन्या सदस्याला पदवीची प्रत देण्याची जाचक अट लावण्यात आल्याने ८७ हजारांपैकी केवळ पाच हजारांवर मतदारांचे बी. फॉर्मची नोंदणी विद्यापीठाकडे झाल्याचे समजते. त्यामुळे शेवटल्या दिवशी जवळपास दहा ते  पंधरा हजारांवर मतदारांचे फॉर्म जमा होण्याची शक्‍यता आहे.

विद्यापीठात नवीन नोंदणी सात सप्टेंबरपर्यंत करण्यात आली. त्यासाठी पदवीची प्रत देणे  बंधनकारक होते. याप्रमाणेच जुन्या मतदारांनीही पहिल्यांदा नोंदणी केल्यावर पदवी प्रमाणपत्र विद्यापीठाकडे सादर केले होते. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम  १४७ (२) (के) नुसार ज्या पदवीधर मतदारांची नावे नोंदविण्यात आलेली आहेत. त्या पदवीधरांना विद्यापीठाचे नोंदणीकृत मतदार मानण्यात येईल. या नोंदणीकृत मतदारांना बी फॉर्म भरून मतदानाचा हक्क बजावता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना, प्रशासनाकडून या नियमांचा भंग करून मतदारांकडून पुन्हा एकदा पदवीची प्रत मागवित आहे. विशेष म्हणजे ८७ हजारांवर असलेल्या मतदारांकडून पुन्हा एकदा पदवीची प्रत घेऊन येणे याला बराच कालावधी लागणार आहे. मात्र, विद्यापीठाने विहित केलेल्या कालावधीमध्ये इतक्‍या मोठ्या प्रमाणात असलेल्या पदवीधरांच्या पदवीची मूळ प्रत आणणे अशक्‍य असल्याची बाब विविध विद्यार्थी आणि शिक्षक संघटनांनी मांडली. त्यावर कुलगुरूंकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते. विशेष म्हणजे कुलगुरूंनी २०१७ मध्ये नोंदणी करणाऱ्यांसाठी ही अट शिथिल केली. मात्र, त्याचा कोणताच फायदा होणार नसल्याचे मत संघटनांनी व्यक्त केले आहे. त्यातूनच आतापर्यंत केवळ पाच हजारावर मतदारांनी बी. फॉर्मची नोंदणी केली आहे.