टाटा ट्रस्ट करणार 139 माजी मालगुजारी तलावांचे पुनर्जिवन

0
13

विभागीय आयुक्त अनूप कुमार व टाटा ट्रस्टचे तारापुरवाला यांनी केल्या करारावर स्वाक्षरी

नागपूर, दि.7 :  पूर्व विभागातील शासवत सिंचनासाठी महत्वपूर्ण असलेल्या माजी मालगुजारी तलावाच्या पुनर्जिवनासाठी शासन तसेच टाटा ट्रस्ट तर्फे पुढाकार घेण्यात आला असून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली व नागपूर जिल्हयातील माजी मालगुजारी तलावातील सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी 30 कोटी रुपये खर्चाच्या महत्वकांक्षी प्रकल्पाचा सामंजस्य करारावर टाटा ट्रस्टचे सचिव तारापुरवाला व विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी स्वाक्षरी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर विभागासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या महत्वकांक्षी करार करण्यात आला आहे. राज्य शासन आणि टाटा ट्रस्टच्या सहभागातून माजी मालगुजारी तलावाचे पुनर्जिवन होणार आहे. टाटा ट्रस्टतर्फे तीन वर्षात 30 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
नागपूर विभागातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्हयातील सामाजिक, आर्थिक विकासाला सहाय्यभूत ठरणाऱ्या माजी मालगुजारी तलावाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा पुनर्स्थापित होणार आहे. माजी मालगुजारी तलावातून फारपूर्वीपासून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होत्या. परंतु कालांतराने सर्व तलाव गाळाने भरल्यामुळे पाणी साठवणूक क्षमता नष्ट झाली आहे. राज्य शासनाने माजी मालगुजारी तलावाच्या पुनर्जिवनासाठी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या शिफारसीनुसार पुनर्जिवनाचा महत्वकांक्षी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला शासनाने मान्यता दिली आहे.
टाटा ट्रस्टच्या सहकार्याने तीन वर्षात 139 माजी मालगुजारी तलावाचे पुनर्जिवन करण्यात येणार असून यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीनुसार तलावाची निवड करण्यात येणार आहे. माजी मालगुजारी तलावामध्ये तीन मीटरपेक्षा जास्त गाळ आहे अशा तलावातील गाळ प्राधान्याने काढण्यात येणार असून 30 कोटी रुपये खर्चाच्या या
उपक्रमांतर्गत 40 लक्ष घनमीटर खोदकाम करुन माती काढण्यात येणार आहे. तलावांच्या खोलीकरणानंतर निर्माण होणाऱ्या जलसाठ्याचा पाणी वापरासाठी पाणी वापर हक्क समित्यांमार्फत करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी टाटा ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती समन्वयाने कामाची सुरुवात करणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पूर्व विदर्भातील धानासह विविध पिकांना शासवत सिंचन उपलब्ध झाल्यामुळे उत्पादनात दुप्पट होण्यास मदत होईल. माजी मालगुजारी तलावाच्या पुनर्जिवनाच्या या महत्कांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी टाटा ट्रस्ट तर्फे मुकुल गुप्ते, तसेच राहूल तभाने यांनी संपूर्ण कामाचा आराखडा तयार केला आहे. पूर्व विदर्भासाठी माजी मालगुजारी तलावाचे पुनर्जिवन हा उपक्रम सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देणारा ठरणार असल्याचे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी यावेळी सांगितले.