कॉंग्रेसचा विधानसभेवर जनआक्रोश मोर्चा

0
6

भंडारा,दि.09ः-  भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी नागपूर येथील विधान भवनावर मंगळवारी (ता.१२) कॉंग्रेसच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार सेवक वाघाये यांनी दिली.
सदर मोर्चा राष्ट्रीय महामार्गावरील खरबी (नाका) येथून विधानपरिषदेचे उपसभापती मानिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत दि.११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता पदयात्रा निघून मोर्चाचा शुभारंभ होणार आहे. सायंकाळी वडोदा येथे मोर्चाचा मुक्काम राहणार आहे. दुसर्‍या दिवशी मंगळवारी (ता.१२) सकाळी ५ वाजता नागपूर करता मोर्चाचे प्रस्थान होवून, सकाळी ९ वाजता एचबी टाऊन नागपूर येथे विश्रांती घेऊन थेट विधान भवनावर धडकणार आहे. या मोर्चाचे आयोजन माजी आमदार सेवक वाघाये याचेवतीने करण्यात आले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे संपूर्ण धान नष्ट झाले असून शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करण्यात यावा तसेच शेतकर्‍यांना सर्व जाचक अटी शिथिल करून सरसकट पिक विमा देण्यात यावा, शेतकर्‍यांकरिता स्वामिनाथन आयोग त्वरीत लागू करणे, ओबीसींची नॉन क्रिमिलिअरची अट रद्द करण्यात यावी व ओबिसी विद्यार्थ्यांना थांबलेली शिष्यवृत्ती देण्यात यावी, शेतकर्‍यांना वयाच्या ६0 वर्षापासून पेंशन योजना लागू करण्यात यावी, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात एम.एस.ई.बी. व्दारा पुर्ण वेळ वीज पुरवठा करण्यात यावा व कृषी पंपाचे वाढवून दिलेले बिल त्वरीत कमी करण्यात यावे, मालगुजारी तलाव व मोठे बांध मत्स्य व्यवसायाकरिता प्रथम प्राधान्य स्थनिक ढिवर बांधवाना देण्यात यावे व वाढवलेली लिज पुर्ववत करण्यात यावी, ओबीसी समुहातील कुणबी, तेली, पोवार, कोहळी, माळी, कलार, धनगर, मुस्लीम, पिंजारी समाजातील क्रिमीलेअरची अट रद्द करा व ओबीसीमध्ये फुट पाडून एक भंग करण्याचे कारस्थान बंद करा आदी मागण्यांचा समावेश आहे.
या मोर्चामध्ये धान उत्पादक शेतकर्‍यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन माजी आमदार सेवक वाघाये यांनी केले आहे.