बल्लारपूरचे पोलीस ठाणे मॉडेल बनविणार

0
19

चंद्रपूर: मुंबईतील घाटकोपर आणि सहारच्या धर्तीवर चंद्रपुरातील बल्लारपूर पोलीस स्टेशन अत्याधुनिक करण्याचा जिल्हा पोलिसांचा मानस आहे. हे पोलीस स्टेशन मॉडेल ठरणार असून त्या दृष्टीने गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

चंद्रपूर उपविभागातील पाचही पोलीस ठाण्यांना अलिकडेच आयएसओ मानांकन मिळाले आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन यांनी अन्य प्रश्नांच्या उत्तरात ही माहिती दिली.

यावेळी उपविभागीय पोलीस उप अधिक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव भुजबळ प्रामुख्याने उपस्थित होते. पोलीस अधिक्षक म्हणाले, बल्लारपूर शहर ठाण्याच्या हद्दीत जागा मोठी असल्याने आणि तेथील कामाचा व्याप मोठा असल्याने हा निर्णय घेतला आहे. मॉडेल ठाणे बनविण्यासाठी नकाशा, डिझाईन तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांच्या इमारती नव्याने बांधण्यासाठी गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव गेले आहेत.

दुर्गापूर पोलीस ठाणे सीटीपीएसच्या इमारतीमध्ये आहे. ती इमारत जुनी आहे. त्यामुळे या नव्या इमारतीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. या सोबतच चिमूर पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीसाठी प्रस्ताव गेला आहे. भद्रावती पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामासाठी निधी आला आहे. सावली, माजरी येथील पोलीस ठाण्यांच्या इमारतींचे बांधकाम सुरु झाले आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहती अद्ययावत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण विभागाकडून चंद्रपुरातील २०० क्वॉर्टर आणि भद्रावतीमधील ७५ क्वॉर्टर उभारण्यासाठी निधी आल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला पोलीस निरीक्षक गीरी, शहर पोलीस निरीक्षक प्रदीप सिरसकर, घुग्घुसचे ठाणेदार मनिष ठाकरे आदी उपस्थित होते.