झिरो माईल परिसरातील अतिक्रमणाचा सफाया

0
7

नागपूर,दि.२८ : नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी झिरो माईल्स परिसरात अतिक्रमण कारवाईचा बडगा उगारला. पथकाने टी पॉईंट परिसरातील मच्छिमार संस्थेच्या इमारतीचे बांधकाम तोडले. या विरोधात मच्छिमार सहकारी संस्थेतर्फे न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने स्थगनादेशही दिला होता. अलिकडेच स्थगनादेश उठविला असताच जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेच्या पथकामार्फत मच्छिमार सोसायटीची तीन मजली इमारत तोडण्याचे आदेश दिले.
बुधवारी सकाळी महापालिकेचे पथक कारवाईसाठी पोहोचले. पाच ‘जेसीबी’च्या सहाय्याने संस्थेची इमारत भूईसपाट करण्यात आली. याठिकाणी मेट्रो रेल्वेतर्फे झिरो माईलच्या मागील भागात मच्छिमार सहकारी संस्थेच्या जागेत हेरिटेज वॉकचा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. महापालिकेकडे तिसर्‍या मजल्याचे बांधकाम तोडण्यासाठी पुरेशी यंत्रसामुग्री नव्हती. लगेच मेट्रो रेल्वेकडून पोकलँड मशीनची व्यवस्था करण्यात आली. पोकलँड मशीनच्या मदतीने बांधकाम तोडण्यात आले. त्याचवेळी खालच्या मजल्यातील भिंती व सभोवतालचे बांधकाम तोडण्यात आले. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत पथकाची कारवाई सुरूच होती. अतिक्रमणविरोधी पथकाला दोन दिवसात इमारतीचे बांधकाम तोडायचे आहे. इमारत तोडताना धुळीमुळे होणारा व्यत्यय बघता अग्निशमन विभागाकडून पाण्याचा मारा करण्यात आला. ही कारवाई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विरोधी पथकाचे जमशेद अली, शहा, संजय कांबळे, यादव जांभुळकर, तहसीलदार पी. बोरकर आदींच्या पथकाने केली.