वैज्ञानिक दृष्टिकोन राष्ट्र विकासाचा पाया-हरिभाऊ पाथोडे

0
24

गोंदिया : वैज्ञानिक दृष्टीकोणाशिवाय राष्ट्राचा विकास अशक्य आहे. संपूर्ण विश्‍वातील राष्ट्रांची प्रगती विज्ञानामुळेच शक्य झाली. अंधविश्‍वास हा समाजाला लागलेला कलंक आहे. अंधश्रद्धेमुळे समाजविघातक कारवायांना खतपाणी मिळते, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले.
नागरा येथील मयुर लॉनमध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या दोन दिवसीयय शिबिरात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, अघोरी प्रथा बंद करून समाजाला वैज्ञानिक टॉनिक पाजण्यासाठी जादू-टोना विरोधी कायदा बनविण्यात आला. मात्र अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत चाचले आहे. केवळ कायदे तयार करून चालणार नाही, तर त्यांची अंमलबजावणी तथा व्यापक जनजागृतीची गरज आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिबिराच्या पहिल्या दिवशी बुद्धीप्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, भूत अंगात येणे, जादू-टोना विरोधी कायदा याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले.अंनिसचे जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे यांनी, जादूटोन्याच्या भांडणामुळे जिल्ह्यात वर्षाला चार ते पाच खून होतात. ३00 पेक्षाही अधिक मानसिक रूग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होतो. कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तत्पर रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. दुसर्‍या दिवशी चमत्काराचे प्रयोग, देवीदेवता अंगात येणे, समितीची देवधर्माविषयक भूमिका, भानामती यावर मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, अंनिसचा देवाधर्माला विरोध नाही तर देवधर्माच्या नावावर चालणार्‍या वाईट प्रथांचा विरोध असल्याचे सांगण्यात आले.
याप्रसंगी रामरतन रेला, यशवंत कावळे, डॉ. निशा भुरे, सावन कटरे, दुर्योधन गिर्‍हेपुंजे, चंद्रकुमार बहेकार उपस्थित होते.प्रास्ताविक अमर वराडे यांनी मांडले. शिबिराला मोठय़ा संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)