राज्याच्या नवनिर्मितीसाठी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे विकासाला गती- अभिमन्यू काळे

0
16

सिध्दी २०१७ ते संकल्प २०१८ उपक्रमाची पत्रपरिषेत माहिती
गोंदिया,दि.२ : राज्याच्या नवनिर्मितीसाठी दुष्काळापासून मुक्ती, शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्ती, प्रदुषणापासून मुक्ती, अस्वच्छतेपासून मुक्ती, करंजजाळापासून मुक्ती, बिल्डरांच्या मनमानीपासून मुक्ती आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती असा सप्तमुक्तीचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या संकल्पपुर्तीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु असल्यामुळे विकासाला गती मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली.
२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सिध्दी २०१७ ते संकल्प २०१८ या उपक्रमाअंतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी काळे बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, बार्टीच्या स्वरोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्यात ९ हजार युवक-युवतींनी सहभाग घेतला. यात ६०५ युवक-युवतींची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. सन २०१६-१७ या वर्षात रमाई घरकुल योजनेतून ९०३ आणि चालू वर्षात ५ हजार घरकुले मंजूर करण्यात आली. सन २०१९ पर्यंत सर्व पात्र लाभाथ्र्यांना या योजनेचा लाभ देण्याचे नियोजन आहे. मागील तीन वर्षात आंतरजातीय विवाह करणाऱ्या २२५ जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे १ कोटी २५ लक्ष ३५ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीची ६६२ कामे मंजूर असून यासाठी २३ कोटी ३९ लक्ष रुपये मंजूर करण्यात आली असून अनेक कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
गोंदिया हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम जिल्ह्यात सुरु असल्याचे सांगून श्री.काळे पुढे म्हणाले, पहिल्या टप्प्यात ३४७ तलावांच्या कामांना सुरुवात करण्यात आली. त्यापैकी १५५ तलावांची कामे पूर्ण करण्यात आली. या तलावातून ६ लाख ६९ हजार ५८७ घनमीटर गाळ काढण्यात आल्यामुळे त्या तलावांची मुळ सिंचन क्षमता पुनस्र्थापित होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील ७२ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप योजनेचा लाभ देण्यात आला असून उर्वरित ७३ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी यासाठी जिल्ह्यातील सर्व ९९७ स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस मशीनच्या माध्यमातून धान्य वितरण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.काळे म्हणाले, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यातील २९० तलावांची निवड करण्यात आली असून ४९ तलावातून २४ हजार ९३ घनमीटर गाळ काढण्यात आला. धडक सिंचन विहिर कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्याला २ हजार विहिरींची उद्दिष्ट देण्यात आले, त्यापैकी १५७८ कामे सुरु करण्यात आली. १०४१ विहिरी पूर्ण झाल्या असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे. विहिरींच्या सुविधेमुळे शेतकऱ्यांना संरक्षीत सिंचनाची बारमाही व्यवस्था उपलब्ध होणार आहे. व्याघ्र प्रकल्पा लगतच्या बफर क्षेत्रातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून ६८६४ कुटूंबांना गॅस कनेक्शन, २४६ कुटूंबांना दुधाळ जनावरांचे वाटप, ३६९ विहिरींना संरक्षीत कठडे, ११५२ कुटूंबांना शौचालये, २८३७ कुटूंबांना गॅस किचन ओटे, ३१८९ कुटूंबांना स्वयंपाकासाठी निर्धुर चुली, ७९ युवकांना वाहन चालकाचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ८२ हजार २९५ शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, आतापर्यंत शासनाकडून ४ ग्रीन लिस्ट प्राप्त झाल्या. त्यामध्ये ५४ हजार २३३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी ४२ हजार ८९३ शेतकऱ्यांच्या खात्यात ८६ कोटी २४ लक्ष ४४ हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. आदिवासी भागातील माता व बालकांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी २८४ गावातील ४७९ अंगणवाड्याच्या माध्यमातून २०३४ गरोदर स्त्रिया व १५८५ स्तनदा मातांना एकवेळचा चौरस आहार डॉ.एपीजे अब्दूल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. मागील दोन वर्षात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ११५ कोटींची कामे मंजूर करण्यात आली असून काही कामांना सुरुवात झाली आहे. पुढील दोन वर्षात प्रत्येकी १५७ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नतीची कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पर्यटन विकासाला चालना देण्यात येत असल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, मागील तीन वर्षात १४ कोटी ४१ लक्ष रुपये जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी खर्च करण्यात आले असून चालू वर्षात ४ कोटी ३६ लक्ष रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक येण्यास मदत होईल. तलाव तेथे मासोळी अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील ६९ तलावात १५ लाख २३ हजार बोटूकली आकाराची मासे टाकण्यात आल्यामुळे यातून ४२० मे.टन मत्स्योत्पादन मिळणे अपेक्षीत आहे. त्यामुळे पारंपारीक मासेमारी करणाऱ्या ढिवर बांधवांची आर्थिकस्थिती सुधारण्यास हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. लोकसहभागातून जिल्ह्यातील सर्व १0६९ शाळा डिजीटल झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानात सन २०१५-१६ मध्ये १९३९ कामे पूर्ण झाली. या कामातून १९ हजार ६४२ हेक्टर संरक्षीत सिंचन क्षेत्र निर्माण झाल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, सन २०१६-१७ या वर्षात २४९० कामे पूर्ण झाली. यामधून १४ हजार ४६२ हेक्टर संरक्षीत सिंचन क्षेत्र निर्माण झाले. तर चालू वर्षात ४२६ कामे पूर्ण झाली तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून जिल्ह्यातील ४० गावात २१ कोटी ५९ लक्ष रुपयांची कामे सुरु होणार असल्यामुळे संबंधित ग्रामस्थांना शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे.18651 नादुरुस्त शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा वापर करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील पुरातन वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून वृक्ष संरक्षण योजना राबविण्यात येत असल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, जिल्ह्यात ६८४७ वृक्षांची नोंद करण्यात आली असून २०४० वृक्षांसाठी २० लक्ष ४० हजार रुपये आर्थिक सहाय्य २५०८ शेतकऱ्यांना वाटप केले आहे. रोजगार हमी योजनेतून सुध्दा जिल्ह्यातील मजूरांना मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करुन देवून रोजगार देण्यात आला आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुध्दा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा हप्ता भरला. जिल्ह्यात सेंद्रीय शेतीची चळवळ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नागरिकांना सेंद्रीय भाताची चव चाखता यावी यासाठी २८०० लोकांना सेंद्रीय तांदूळाचा भात खावू घालण्यात आला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करुन उत्पन्न घ्यावे व जास्त किंमत मिळण्यास सुध्दा ही शेती उपयुक्त असल्याचे श्री.काळे यांनी सांगितले.