गावे आजारमुक्त करण्यासाठी शोषखड्डे आवश्यक- अभिमन्यू काळे

0
11

ङ्घ डासमुक्त गावासाठी सभा
ङ्घ माहूर पं.स.सभापतीने केले सादरीकरण
गोंदिया,दि.६: अनेक आजार हे सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या डासामुळे होतात. सांडपाण्याचा योग्य निचरा झाला पाहिजे. तरच भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. गावे डासमुक्त झाली तरच गावे आजारमुक्त होईल, यासाठी शोषखड्डे करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
तिरोडा येथील अदानी वीज निर्मिती प्रकल्पातील सभागृहात ४ जानेवारी रोजी शोषखड्डे निर्मितीतून डासमुक्त गाव करण्यासाठी आयोजित कार्यशाळेत जिल्हाधिकारी काळे हे अध्यक्ष म्हणून बोलत होते. सभेला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंताडा राजा दयानिधी, माहूर पं.स.सभापती मारुती रेकुलवार, अदानी प्रकल्पाचे स्टेशन हेड श्री.साहू यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.काळे म्हणाले, यावर्षी दुष्काळ सदृश्यस्थिती आहे. त्यामुळे आतापासून नियोजन करुन शोषखड्डे तयार करण्याचे आणि छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संकलन मोठ्या प्रमाणात करावे लागणार आहे. दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन दयावा लागणार आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त रोजगाराची कामे उपलब्ध करुन देण्यासाठी १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी आतापासूनच खड्डे करावे. रब्बी हंगामात सुध्दा पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार नसल्यामुळे रोहयोतून मोठ्या प्रमाणात कामे घ्यावी असे त्यांनी सांगितले.
ज्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे त्या गावांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आतापासूनच नियोजन करावे असे सांगून श्री.काळे म्हणाले, पिण्याच्या पाण्याच्या योजनांची दुरुस्ती करावी. सार्वजनिक विहिरीतील गाळ काढून घ्यावा. ज्या ठिकाणी विंधन विहिरीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी विंधन विहिरीसाठी मंजूरी घ्यावी. नादुरुस्त विंधन विहिरींची दुरुस्ती करावी. पाईप कमी पडत असतील तर बोअरसाठी पाईपची मागणी करावी. गावांसाठी ज्या ठिकाणावरुन पाणीपुरवठा करण्यात येतो तेथील पाण्याच्या स्त्रोतावर शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतीतील विहीर किंवा विंधन विहिरीचा परिणाम होत असेल तर अशांवर पाणी उपसा करण्यास बंदी घालावी व संभाव्य पाणीटंचाईवर मात करावी असे त्यांनी सांगितले.
रोजगार हमी योजनेची कामे प्रत्येक तालुक्यातील १० गावात येत्या १० जानेवारीपासून सुरु करावी असे निर्देश देवून श्री.काळे म्हणाले, २६ जानेवारीपर्यंत १ लाख मजूर रोहयोच्या कामावर असतील असे नियोजन करावे. पिण्याच्या पाण्याची टंचाई ज्या गावांना भासणार आहे त्या गावांचे प्रस्ताव पाठवावे असे ते म्हणाले.
श्री.दयानिधी म्हणाले, शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल विभागाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यासाठी ज्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नाही अशांना जातीचे प्रमाणपत्र तातडीने मिळवून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी सहकार्य करावे. जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. जे ग्रामसेवक मुख्यालयी राहणार नाही त्यांचा घरभाडे भत्ता कपात करण्यात येईल. यापूर्वी देण्यात आलेला घरभाडे भत्ता देखील वसूल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्री.रेकुलवार यांनी आपल्या सादरीकरणातून माहूर तालुक्यातील लांजी या गावी तत्कालीन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.काळे यांच्या संकल्पनेतून गावे डासमुक्त करण्यासाठी मी सरपंच असतांना लांजीत प्रत्येक घरी सांडपाण्याचा जमिनीत योग्य निचरा व्हावा यासाठी शोषखड्डे केले. शोषखड्यामुळे गाव डासमुक्त तर झालेच सोबत या पाण्याचा जमिनीत चांगला निचरा होत असल्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. पूर्वी उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचे स्त्रोत कोरडे पडायचे मात्र शोषखड्डयामुळे पाण्याचा निचरा होवू लागल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात देखील विहीरी, विंधन विहिरींना देखील चांगले पाणी उपलब्ध झाले. ३०० कुटूंबाच्या लांजीत दररोज दीड लाख लिटर पाणी इतरत्र वाहून न जाता भूगर्भात साठविले जाते. वर्षभरात ५ कोटी ४० लक्ष लिटर पाण्याचा निचरा होत असल्याचे सांगून श्री.रेकुलवार म्हणाले, शोषखड्डयामुळे संपूर्ण गाव डासमुक्त तर झालेच सोबत आजारमुक्त झाल्याचे सांगितले.
जिल्हा डासमुक्त करण्यासाठी शोषखड्डे तयार करण्याच्या नियोजनाबाबतची माहिती सहायक प्रकल्प अधिकारी (रोहयो) यांनी तालुक्यातील गावनिहाय दिली. सभेला उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाराम तळपाडे, अदानी फाउंडेशनचे नितीन शिराळकर, सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी आणि सहायक प्रकल्प अधिकारी (रोहयो) यांची उपस्थिती होती.