मुंबई मॅरॉथॉनसाठी ७३ आदिवासी विद्यार्थी रवाना

0
10

लोकशाही व विकासाला मारक ठरणाऱ्या नक्षली तत्वज्ञानापासून युवापिढीने दूर राहावे- अंकुश शिंदे

गोंदिया,दि.१८ : जंगलामध्ये पसरलेला नक्षलवाद आता शहरी भागात पसरत आहे. या नक्षलवादाला चोख प्रतिउत्तर दिले जाईल. गोंदिया व गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल व दुर्गम भागातील विद्यार्थी लोकशाही व विकासासाठी दौड हा संदेश घेवून मुंबई मॅरॉथॉन स्पर्धेत सहभागी होत आहे. लोकशाही व विकासाला मारक ठरणाऱ्या नक्षली तत्वज्ञानापासून युवापिढीने दूर राहावे. असे आवाहन गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांनी केले.
गोंदिया पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात गोंदिया व गडचिरोली नक्षलग्रस्त क्षेत्रातील ७३ आदिवासी विद्यार्थांची चमू टाटा मुंबई मॅरॉथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १७ जानेवारी रोजी निघाली. त्यावेळी त्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात श्री.शिंदे बोलत होते. यावेळी गोंदिया पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, गडचिरोली पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.शिंदे म्हणाले, या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांपैकी कोणीही आतापर्यंत मुंबई पाहिलेली नाही. ही वस्तुस्थिती असली तरी विद्यार्थ्यांनी लोकशाही आणि विकासासाठी दौड हा संदेश घेवून मुंबई मॅरॉथॉन स्पर्धा जिंकून आपल्या जिल्ह्याचा व राज्याचा नावलौकीक जागतिक स्तरावर वाढवावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी श्री.शिंदे यांनी नक्षलवादाचा उगम व त्यानंतरच्या प्रवासामध्ये देश व राज्यामध्ये ओढवलेला विनाश यावर प्रकाश टाकला.
डॉ.देशमुख म्हणाले, नक्षलवादाची वैचारिक बैठक समजून घेवून लोकशाही व विकासाच्या आड येणाऱ्या या नक्षलवादी तत्वज्ञानास मुळापासून उखडून टाकून गडचिरोली व गोंदिया ही जिल्हे नक्षलमुक्त करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकातून डॉ.भूजबळ यांनी लोकशाही आणि विकासासाठी दौड या उपक्रमाची रुपरेषा विशद केली. गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये राबविलेल्या सुरक्षा दौड या उपक्रमाची माहिती देवून जिल्ह्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. आदिवासी समाजाचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेल्या कचारगड येथील पारी कुपार लिंगो व माँ काली कंकाली या जिल्ह्यात असलेल्या श्रध्दास्थानाविषयी माहिती दिली.
गोंदिया व गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील ५२ मुले आणि २१ मुली असे एकूण ७३ आदिवासी विद्यार्थी मुंबई येथे ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरॉथॉन स्पर्धेत सहभागी होत आहे. या विद्यार्थ्यांचे धावण्याच्या स्पर्धेतील कौशल्य व नैपुण्य वृध्दींगत करण्यासाठी गोंदिया पोलीस मुख्यालय येथे १२ ते १७ जानेवारी या कालावधीत सराव व प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना विशेष आहार देण्यात आला. पोलीस विभागातील खेळाडू, कर्मचारी व क्रीडा मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांचा कसून सराव घेण्यात आला.
समारोपीय कार्यक्रमात देवरी तालुक्यातील पालांदूर/जमी. येथील चेतन पदे व गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील जांभळी येथील अंजली कोरचा या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून पोलीस विभागाच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
मुंबई मॅरॉथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या चमूचे मुख्य व्यवस्थापक म्हणून अपर पोलीस अधीक्षक संदीप अटोले हे काम पाहणार असून त्यांच्या मदतीला देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरिक्षक नागेश भाष्कर व इतर ८ पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक व कवायत निर्देशक यांचे पथक व्यवस्थापनासाठी नेमण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची ही चमू १७ जानेवारी रोजी गोंदिया येथून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईसाठी रवाना झाली. रेल्वेस्टेशनवर या चमूला शुभेच्छा देण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.