संगणक परिचालकांचा जि.प.वर मोर्चा

0
11

भंडारा,दि.19ः- जिल्ह्यातील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ५४२ संगणक परिचालकांवर मानधनाअभावी उपासमारीचे संकट ओढावले आहे. नियमित मानधन व मागण्यांसाठी गुरुवारी, जिल्ह्यातील शेकडो संगणक परिचालकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर आठ दिवसात मागण्या निकाली काढण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली.
मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओम तिबुडे, सचिव दिपक बागडे यांनी केले. शास्त्री चौकातून निघालेला मोर्चा जिल्हा परिषदेसमोर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी व परिचालकांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर शिष्टमंडळाकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवदन सादर करण्यात आले. यावेळी पोलिस विभागाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
प्रत्येक ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश अंतर्गत दाखले, प्रमाणपत्र नागरिकांना पुरविण्याकरिता आपले सरकार सेवा केंद्रात केंद्रचालक यांची नियुक्ती सीएससी-एसपीव्ही या कंपनीद्वारे करण्यात आली. सुरूवातीला कंपनीद्वारे केंद्र चालकांचे मानधन देण्यात येत होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून केलेल्या कामाचे मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे कामबंद आंदोलन पुकारले असून १८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदवर मोर्चा काढण्यात आला.
जुलै २0१७ ते डिसेंबर २0१७ या कालावधीतील मानधन देण्यात यावे, बहुतांशी केंद्रचालकांचे माहे एप्रिल २0१७ ते जून २0१७ या कालावधीतील थकित मानधन देण्यात यावे, प्रिया स्वाफ्ट क्लोजिंगच्या नावाखाली कपात झालेले मानधन देण्यात यावे. तसेच संग्राम प्रकल्पातील उर्वरित सर्व संगणक व परिचालकांना आपले सरकार प्रकल्पात रूजू करून घेण्यात यावेत, आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित झाल्यापासून ३१ डिसेंबर २0१७ पर्यंतचे सर्व थकित मानधन त्वरीत देण्यात यावेत, कपंनीमार्फत साहित्य पुरविण्यात यावेत, जिल्ह्यातील सर्व केंद्रचालकांना कंपनीकडून मानधनाची पोचपावती देण्यात यावी, निश्‍चित तारखेला मानधन करण्यात यावेत आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.