चरस आणि गांजाची सर्रास विक्री तरुणाई धोक्यात

0
15
सालेकसा,दि.19ः- तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले आमगाव खुर्द येथे चरस आणि गांजाची सर्रास विक्री होत आहे. वय १२  ते २२ वयोगटातील तरुण मुले सर्रासपणे चरस आणि गांजा सारखे मादक पदार्थाचे सेवन करत आहेत. शालेय शिक्षण घेण्याचा वयात हि मुले असल्या मादक पदार्थांचा सेवन करणे म्हणजे प्रशासन, पालक वर्ग, पोलीस खाते, शाळेचे मुख्याध्यापक ह्यांच्या सर्वांच्या कामगिरी वर प्रश्न निर्माण करणारे आहे.  शहरातील  बाबाटोली भागात ह्या मादक पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती दस्तूर खुद्द त्याच व्यक्तीकडून मिळाली ज्यांनी ह्या पदार्थ्यांचा सेवन नियमित करतात. पालकांकडून शाळेची फी, गाडीचा पेट्रोल, गाडी दुरुस्ती, नोटबुक इत्यादी कारण सांगून हे मुल पालकाकडून पैसे ओखतात आणि चरस आणि गांजाची खरेदी करून सेवन करत असतात. पैशाची पुर्ती करण्यासाठी हे मुल जवळपास सुरु असलेल्या बांधकाम साहित्य चोरून ते विकून, शासकीय कामाचे लावलेलं फलक चोरून ते विकून व इतर गैरप्रकार करून आणि चोरी करून पैसे मिळवतात. रात्रीच्या अंधारात तहसील कार्यालय मैदान, औद्यागिक प्रशिक्षण संस्था च्या जवळपास असलेले पान टपऱ्या, पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ असलेले रिकामे वसाहती, गडमाता टेकडीचे प्रांगण, बायपास रोड, श्मशान भूमी हे त्यांचे अड्डे बनतात. पालकवर्ग अश्या प्रकरणावर मुलाची आणि कुटुंबाची अब्रू जावू नये म्हणून पडदा टाकतानाचे सचित्र आढळून येत आहे. शिक्षक, मुख्याध्यापक वर्ग शाळेच्या बाहेर आम्ही काही करू शकत नाही आणि ते आमचे नैतिक अधिकार सुद्धा नाही असे बोलून प्रकरणातून हात झटकतात. पोलीस खाते नक्षल कृती नियंत्रण, पोलीस गस्त, बंदोबस्त, नेत्यांचे दौरे ह्यातच व्यस्त असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी वृत्ती वाढत असून कायद्याची जाणिव नाही. याकडे प्रशासन कुठलीही जनजागृती मोहीम राबवताना दिसत नाही आहे.
“एवढ्या कमी वयात असे अवजड व्यसन म्हणजे संपूर्ण तालुक्यासाठी एक शोकांतिका आहे. ह्यात पालकवर्ग जबाबदार तर आहेतच पण प्रशासन सुद्धा तितकाच दोषी आहे. तालुक्याच्या मुख्य ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्थलांतरित लोक राहत आहेत त्यांची कुठलीही चौकशी न करता त्यांना राहायला आणि व्यवसायाला थारा मिळतेच कशी ? ह्यावर लवकरात लवकर कार्यवाही करून तोडगा काढणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा संपूर्ण पिढी डबघाईला जाईल. पोलिसांच्या मदतीने ह्यांचे अड्डे नष्ट करणे अत्यंत गरजेचे असनू पक्षातर्फे जी मदत लागेल ती करायला आम्ही तयार आहोत. ”
  ब्रजभूषण बैस, तालुका अध्यक्ष, मनसे सालेकसा