गडचिरोलीच्या आठ पोलिसांना शौर्यपदक

0
4

गडचिरोली,दि.20 : पोलीस दलात उल्लेखनिय सेवा दिल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेले राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक आणि राज्य पोलीस दलाच्या शौर्य पदकांचे वितरण मंगळवारी (दि.१६) मुंबईत राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. हे पदक पटकाविणाऱ्यांत गडचिरोली जिल्ह्यातील ८ पोलीस जवानांचा समावेश आहे.
एटापल्ली तालुक्यातील हिदुर चकमकीत २८ आॅक्टोबर २०१३ रोजी शहीद झालेले पोलीस हवालदार गणपत नेहरू मडावी यांना राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक मिळाले. त्यांच्या पत्नी मीना गणपत मडावी यांनी हे पदक स्वीकारले. याशिवाय शहीद शिपाई सुनील तुकडू मडावी, नायब पो.शिपाई विनोद मस्सो हिचामी, इंदरशहा वासुदेव सडमेक, गिरीधर नागो आत्राम, सदाशिव लखमा मडावी, गंगाधर मदनय्या सिडाम आणि पो.शिपाई मुरलीधर सखाराम वेलादी या सात जणांना पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले.
यावेळी गृहराज्यमंत्री (शहर) डॉ.रणजित पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथुर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर व इतर वरिष्ठ अधिकारी आणि शहीदांचे कुटुंबिय उपस्थित होते.