लेखा-मेंढा येथे २७, २८ ला १५ वे राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन

0
18

गडचिरोली दि.२१: – राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार व्हावा, तसेच ग्रामसभा, गावगणराज्य, स्वयंरोजगार इत्यादी संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी विचारांची पेरणी व्हावी, यासाठी २७ व २८ जानेवारी रोजी धानोरा तालुक्यातील मेंढा-लेखा येथे १५ वे राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती संमेलनाचे प्रवर्तक ज्ञानेश्‍वर रक्षक यांनी  गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला गुरुकुंज मोझरीचे रवी मानव, छाया रवी मानव, गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ.शिवनाथ कुंभारे, सचिव पंडितराव पुडके, सुखदेव वेठे उपस्थित होते.
२७ तारखेला सर्वजण निवडक महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना भेटी घेऊन त्यांचे प्रबोधन करणार आहेत. २८ जानेवारीला सकाळी १0 वाजता गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कल्याणकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद््घाटन होणार असून, औरंगाबादचे भास्कर पेरे पाटील संमेलनाध्यक्ष राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून समाजसेवक देवाजी तोफा राहतील. गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक हरिभाऊदादा वेरुळकर हे विशेष निमंत्रित आहेत. दुपारच्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी मोहन हिराबाई हिरालाल हे राहतील, तर वक्ते म्हणून चंदू पाटील मारकवार, नत्थूजी भुते, प्रा.डॉ.राजन जयस्वाल, मोरेश्‍वर उईके हे आपले विचार मांडतील. त्यानंतरच्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. हिरामण वरखडे हे राहणार असून, वक्ते म्हणून डॉ. सतीश गोगुलवार व प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर विचार मांडतील.या संमेलनात डॉ.शिवनाथ कुंभारे, तेजराम बगमारे व ग्यानिवंत घोडमारे यांना राष्ट्रसंत सेवाव्रती पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात येणार आहे. शिवाय तुकारामदादा गीताचार्यांचा-लढा गाव गणराज्याचा या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल, अशी माहिती ज्ञानेश्‍वर रक्षक यांनी दिली.