मुंबईतील मॅरेथॉनमध्ये धावले गोंदिया-गडचिरोलीच्या दुर्गम भागातील युवक

0
9

गोंदिया, दि.२२: पोलिस विभागातर्फे रविवारला मुंबई येथे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत गडचिरोली परिक्षेत्रातील गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील 73 तरुण, तरुणींनी सहभाग नोंदवून ‘रन फॉर डेमॉक्रॉसी अँड डेव्हलपमेंट’चा नारा दिला.

मुंबई येथे आज टाटा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, गोंदियाचे पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील १७ युवतींसह ७३ उमेदवार स्पर्धेत धावले. सहायक पोलिस निरीक्षक श्री.चव्हाण, राखीव पोलिस उपनिरीक्षक श्री.महाडेश्वर यांच्यासह हे या स्पर्धकांसह उपस्थित होते. पोलिस महानिरीक्षक अंकुश शिंदे, गोंदियाचे अपर पोलिस अधीक्षक श्री.आठवडे यांनी स्वत: उपस्थित राहून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना नेहमीच माओवाद्यांच्या हिंसक कारवायांना सामोरे जावे लागते. माओवादी लोकशाही मार्गाने होणाऱ्या विकासकामांना नेहमीच विरोध करुन कामे पूर्ण होऊ देत नाही. या बाबींचा निषेध नोंदवत सहभागी उमेदवारांनी रन फॉर डेमॉक्रॉसी अँड डेव्हलपमेंट चा नारा देत मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतल्याची माहिती पोलिस विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या 73 युवक,युवती,विद्यार्थ्यांच्या चमुचे प्रमुख म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक संदीप अटोले यांनी भूमिका पार पाडली.त्यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे,चिचगडचे पोलीस निरिक्षक नागेश भाष्कर,संदिप चव्हाण यांच्यासह 8 पोलीस अधिकारी,कर्मचारी,कवायत प्रशिक्षक उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय राज्य राखीव बल क्रमांक 8 मुंबई येथील कार्यालयात करण्यात आली होती.