पालकमंत्र्यांच्या हस्ते नववर्ष कॅलेंडरचे प्रकाशन; स्थलांतरीत व विदेशी पक्षांसह पर्यटनस्थळांची माहिती

0
19

जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
गोंदिया,दि.३ : जिल्ह्यात जास्तीत जास्त पर्यटक व पक्षी अभ्यासक पर्यटनस्थळांना व तलावांवर येणाऱ्या स्थलांतरीत व विदेशी पक्षांना बघण्यासाठी यावेत व या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी स्थलांतरीत व विदेशी पक्षांची तसेच जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती असलेले सन २०१८ या नववर्षाचे बहुरंगी भित्ती कॅलेंडर जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केले आहे. या कॅलेंडरचे प्रकाशन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते ३ फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, खासदार अशोक नेते, आमदार सर्वश्री गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, नियोजन विभागाचे उपायुक्त बकुल घाटे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
गोंदिया जिल्हा जैवविविधतेने आणि वन्यजीवसृष्टीने समृध्द आहे. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियातील परसवाडा, झिलमिली, घाटटेमणी, लोहारा, नवेगावबांध, श्रृंगारबांध, नवनीतपूर, सिरेगावबांध, सलंगटोला, बाजारटोला, कुंभारटोली व पदमपूरसह अन्य तलावांवर मध्यपूर्व एशिया, मध्य युरोप, दक्षिणपूर्व आशिया, दक्षिण व उत्तर युरोप, पूर्व चीन, सायबेरिया, मंगोलिया, अमेरिका, रशिया, फ्रांस, हॉलंड, इंडोनेशिया, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकीस्तान, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका व आखाती देशातून बार हेडेड गुज, ब्राऊन हेडेड गल, कॉम्ब डक, कॉमन टील, कॉमन पोचार्ड, परपल हेरॉन, कॉमन क्रेन, युरेशियन स्पुन बील, ग्रे लॅग गुज, रेड क्रिस्टेड पोचार्ड, नॉर्थन शॉवेलर, व्हाईट नेक्ट स्टॉर्क यांचे बहुरंगी सचित्र त्या पक्षांचे मराठी नाव व कोणत्या देशातून हे पक्षी स्थलांतरीत होतात याबाबतची थोडक्यात माहिती या कॅलेंडरमध्ये देण्यात आली आहे. या पक्षांसह विविध प्रजातीचे ३२५ पेक्षा जास्त स्थलांतरीत व विदेशी पक्षी जिल्ह्यातील तलावांवर हिवाळ्याच्या दिवसात हमखास येतात.
जिल्ह्यात असलेले हाजराफॉल, प्रतापगड, कचारगड, माँ मांडोदेवी देवस्थान, बोदलकसा जलाशय, चुलबंद प्रकल्प, संत लहरीबाबा कामठा आश्रम, नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, नागझिरा वन्यजीव अभयारण्य, भवभूतीची जन्मभूमी पदमपूर, श्रमाचे प्रतिक अर्धनारेश्वरालय, राज्यातील एकमेव तिबेटियन कॅम्प या पर्यटन व तीर्थस्थळांची थोडक्यात सचित्र माहिती या कॅलेंडरमध्ये देण्यात आली आहे तसेच वर्षभरात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शासकीय सुट्यासुध्दा नमूद करण्यात आल्या आहे.
कॅलेंडरच्या प्रकाशनाच्यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी कॅलेंडर तयार करण्यामागची भूमिका विशद केली व कॅलेंडरचे प्रकाशन केल्याबद्दल मान्यवरांचे आभार मानले.